शेतकऱ्यांना मिळाले बियाणे

शेतकऱ्यांना मिळाले बियाणे
Published on: 

अखेर शेतकऱ्यांना
बियाणे मिळणार!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हस्तक्षेपाला यश

ॲग्रोवन वृत्तसेवा
यवतमाळ : बियाणे वितरणासाठी निवड झाल्याचा मोबाईलवर संदेश मिळाल्यानंतरही दुसऱ्याच दिवशी जाहीर झालेल्या यादीतून नावे गहाळ झाल्याने संभ्रमात पडलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतकरी नेते मनीष जाधव यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून कृषी विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर पहिल्या यादीतील शेतकऱ्यांनाही अनुदानावर हरभरा बियाणे देण्याचे आदेश पुसदचे तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे यांनी दिले.
कृषी विभागाच्या वतीने ‘कडधान्य आत्मनिर्भरता अभियान २०२६-२७’ अंतर्गत रब्बी हंगामासाठी प्रमाणित बियाणे वितरण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त ७५ किलो हरभरा बियाणे अनुदानावर देण्याची तरतूद आहे. यासाठी लाभार्थ्यांची निवड सोडत पद्धतीने करण्यात आली. २८ ऑक्टोबरला पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर संदेश पाठवून बियाणे वितरणासाठी निवड झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच पुसद तालुक्यातील सात कृषी केंद्रांमधून बियाणे उचलण्याच्या सूचना कृषी सहायकांमार्फत देण्यात आल्या.
मात्र, संदेश मिळाल्यामुळे बियाणे घेण्यासाठी कृषी केंद्रांवर पोहोचलेल्या शेतकऱ्यांना तेथे वेगळाच अनुभव आला. २९ ऑक्टोबरला नवीन यादी प्रसिद्ध झाली असून, त्यामध्ये संबंधित शेतकऱ्यांची नावे नसल्याचे कृषी केंद्रचालकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे एक दिवसापूर्वी निवड झाल्याचा संदेश मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि संताप निर्माण झाला. सोडतीत निवड होऊनही प्रत्यक्ष वितरणाच्या वेळी नाव नसल्याने शेतकऱ्यांनी या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या प्रकाराची माहिती मिळताच शेतकरी नेते मनीष जाधव यांनी संबंधित शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून शेतकऱ्यांची अडचण मांडली. पहिल्या यादीच्या आधारे निवडीचा संदेश मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा यादीतून वगळणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत वरिष्ठ स्तरावरही पाठपुरावा करण्यात आला. अखेर कृषी विभागाने या मागणीची दखल घेत २८ ऑक्टोबरच्या पहिल्या यादीतील शेतकऱ्यांनाही अनुदानावर बियाणे देण्यास मान्यता दिली.
मात्र, ज्या शेतकऱ्यांना ज्या कृषी केंद्रातून बियाणे उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्यांनी त्याच केंद्रातून बियाणे घ्यावे, अशी अट घालण्यात आली आहे. एका शेतकऱ्याला ७५ किलोपर्यंत बियाणे देण्याचे नियोजन असले, तरी पाच किलोपेक्षा अधिक वजनाच्या बियाण्यांची स्वतंत्र पॅकिंग बॅग उपलब्ध नसल्याने वितरणात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनुदान मंजूर झाल्यानंतरही प्रत्यक्ष वितरणाचे नियोजन कृषी विभागाला करावे लागणार असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, या योजनेतील बियाणे महाबीजकडून सुमारे महिनाभरापूर्वीच कृषी केंद्रांना उपलब्ध झाले होते. मात्र, लाभार्थ्यांची निवड आणि सोडतीची प्रक्रिया उशिराने पूर्ण झाल्याने वितरणाला विलंब झाला. सध्या पाण्याची उपलब्धता कमी असताना रब्बी हंगामातील पेरणीचे नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे मिळणे आवश्यक होते. पंधरा दिवसांपूर्वीच बियाणे वितरित झाले असते, तर शेतकऱ्यांना पिकाला पाण्याच्या उपलब्धतेनुसार पुढील नियोजन करता आले असते. प्रतिकिलो ६० रुपयांचे अनुदान मिळत असल्याने ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत असली, तरी लाभार्थी निवड आणि वितरणातील विलंबामुळे कृषी विभागाच्या सूक्ष्म नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हस्तक्षेपामुळे पहिल्या यादीतील शेतकऱ्यांच्या बियाणे वितरणाचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी भगवान हरिभाऊ राठोड (धुळे-वाळतूर रेल्वे), जय ठाकरे (भोजला), अशोक लोडबाजी शिकारे (बेलोरा), सरस्वती नथू जाधव (आमठी) यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.