इंदापूर तालुक्यामध्ये पाण्यासाठी शेतकऱ्यांनी उभारल्या काळ्या गुढ्या

राजकुमार थोरात
शनिवार, 24 मार्च 2018

वालचंदनगर (पुणे) : नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यास प्रशासन व शासन चालढकल करीत असल्याने इंदापूर तालुक्यातील नदीकाठच्या निरवांगी, दगडवाडी, निमसाखर गावातील शेतकऱ्यांनी काळ्या गुढ्या उभारुन शासनाचा निषेध केला.

वालचंदनगर (पुणे) : नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यास प्रशासन व शासन चालढकल करीत असल्याने इंदापूर तालुक्यातील नदीकाठच्या निरवांगी, दगडवाडी, निमसाखर गावातील शेतकऱ्यांनी काळ्या गुढ्या उभारुन शासनाचा निषेध केला.

नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी इंदापूर तालुक्यातील नदीकाठचे शेतकरी आक्रमक झाले आहेत. रास्तारोकोच्या आंदोलनानंतर नीरा नदीमध्येच १६ शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरु करण्यात असून आज शनिवारी (ता.२४) उपोषणाचा तिसरा दिवस होता. उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची प्रकृती खालावली जात आहे. मात्र प्रशासनातील अधिकारी शेतकऱ्यांच्या उपोषणाला दाद देत नसून नदीमध्ये पाणी न सोडण्याच्या भूमिकेवरती ठाम असल्याने इंदापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी गावे बंद ठेवून काळ्या गुढ्या उभारुन शासन व प्रशासनाचा निषेध करण्यास सुरवात केली आहे.

आज पहिल्या टप्यांमध्ये नदीकाठच्या निरवांगी, निमसाखर व दगडवाडी गावातील शेतकरी व नागरिकांनी गाव बंद ठेवून काळ्या गुढ्या उभारुन निषेध केला. उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना तालुक्यातील नदीकाठच्या गावांचा पाठिंबा वाढत चालला अाहे. माजी सरपंच दशरथ पोळ, अजिनाथ कांबळे, खोरोचीचे सरपंच संजय चव्हाण यांच्यासह १६ उपोषणासाठी बसले आहे. आज आमदार दत्तात्रेय भरणे, छत्रपतीचे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप, संचालक अभिजित रणवरे, वीरसिंह रणसिंग, नंदकुमार पाटील यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली. 

नीरा नदी कोरडी पडल्यामुळे  शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. धरणामध्ये पाणी साठा चांगला असल्याने शासनाने नदी काठच्या गावातील शेतकऱ्यांची मागणीचा विचार करुन नीरा उजव्या,डाव्या कालव्यातुन पाणी सोडावे. शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी सोमवारी (ता.२६)  मुंबईमध्ये अधिवेशनामध्ये तातडीच्या बैठकीसाठी प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे  आमदार दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले.

आज उपोषणाचा तिसरा दिवस असल्याने उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची प्रकृती जास्त खालावली होती.चार-पाच शेतकऱ्यांना जागेवरतीच सलाईन सुरु करण्यात आली आहे. आमदार भरणे यांनी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांशी फाेनवरुन संपर्क केल्यानंतर उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी फोन दिल्यानंतर धनंजय रणवरे या शेतकऱ्यांने  पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे यांना आम्ही शेतकऱ्यांनी पाण्यासाठी मराव का? मेल्यानंतर अंत्यविधीही नदीकाठीच  लगेच करता येईल असे सांगताच उपस्थित नागरिकामध्ये शांतता पसरली.मात्र तरीही प्रशासन व शासन पाणी न सोडण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने शासन शेतकरी विरोधी  असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.

उद्या सामुहिक मुंडण

प्रशासन पाणी सोडण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने उद्या रविवारी (ता.२५) निरवांगीमध्ये शेतकरी सामुहिक मुंडन करुन शासनाचा निषेध करणार असल्याचे माजी सरंपच दशरथ पोळ यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers stands black gudhi for lack of water in indapur