विमा कंपन्यांची किती दिवस वाट पाहायची?

योगेश कामथे ः सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

पुरंदर तालुक्‍यातील हजारो शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पिकांचा विमा उतरवला आहे. अवकाळी पावसाने या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अजूनही पीकविमा कंपन्या पंचनाम्यासाठी आलेल्या नाहीत. पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांनी किती दिवस वाट पाहावी, असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

पंचनामे रखडल्याने पुरंदरमधील शेतकऱ्यांचा सवाल

खळद (पुणे) : पुरंदर तालुक्‍यातील हजारो शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पिकांचा विमा उतरवला आहे. अवकाळी पावसाने या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अजूनही पीकविमा कंपन्या पंचनाम्यासाठी आलेल्या नाहीत. पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांनी किती दिवस वाट पाहावी, असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी "प्रधानमंत्री फसल बिमा योजना' अंतर्गत वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून कांदा, भुईमूग, बाजरी व अन्य पिकांचा, फळबागांचा विमा उतरविला आहे. विमा काढल्यानंतर गेली काही दिवसांपासून या भागात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी पीकविमा कंपन्यांकडून भरपाई मिळावी, यासाठी वाट पाहत आहेत.

सध्या पावसाने उघडीप दिल्याने सर्व शेतकरी नुकसानग्रस्त पिके काढून रब्बी पिके घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र पीकविमा कंपन्यांनी पंचनामा करताना नुकसानग्रस्त पिकांचे फोटो आवश्‍यक असल्याचे जाहीर केले आहे. मात्र पुरंदर तालुक्‍यात सद्यपरिस्थितीत पीकविमा कंपन्यांचा एकच प्रतिनिधी पंचनाम्यासाठी असून, बाधित शेतकरी हजारो आहेत. त्यामुळे एकट्या प्रतिनिधीच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्‍यात तातडीने पंचनामा करणे अवघड आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिके शेतात किती दिवस ठेवणार, हा प्रश्‍न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

सर्व परिस्थितीचा विचार करता पीकविमा कंपन्यांनी फोटोची अट शिथिल करून शेतकऱ्यांना सरसकट विमा मंजूर करावा, विमा उतरविताना सर्व कागदपत्रे दिलेली असताना पुन्हा मागू नये, कृषी विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत. कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, जेणेकरून रब्बी हंगामासाठी त्याची मदत होईल, अशा मागण्या शेतकरी करीत आहेत.

पुरंदर तालुक्‍यात पीकविमा उतरविलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही जवळपास 1532 आहे. मी माझ्या परीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र सर्व शेतकऱ्यांचे फोटो काढण्यासाठी मला जवळपास एक महिन्याचा कालावधी लागेल.
-अमोल धुमाळ,
प्रतिनिधी, ऍग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers waiting for Crop Insurance