पुरी येथे कांदा पिकाला टँकरने पाणी देण्याची वेळ

पुरी येथे कांदा पिकाला टँकरने पाणी देण्याची वेळ
Published on: 

PGR26B03879
पुरी (ता. बार्शी) : येथील शेतकरी सोपान मोरे यांचे कांदा पीक पाण्याअभावी जळू लागल्याने टँकरद्वारे पाणी देऊन पिके जगविण्याची वेळ आली आहे.
---
कांदा जगवण्यासाठी टँकरने पाणी देण्याची वेळ
एका एकरासाठी १५ हजारांचा खर्च; पांगरी भागात पाणीटंचाई तीव्र
बाबासाहेब शिंदे : सकाळ वृत्तसेवा
पांगरी, ता. २९ : पावसाने पाठ फिरवल्याने पांगरी परिसरात शेतीसाठी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कांदा पीक परिपक्व होण्याच्या टप्प्यावर असताना पाण्याअभावी ते वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. लागवड, मशागत आणि फवारण्यांवर खर्च केल्यानंतर आता सिंचनासाठीही मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
पांगरीपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावरील पुरी (ता. बार्शी) येथील शेतकरी सोपान मोरे यांनी यंदा तीन एकरांवर कांदा लागवड केली आहे. मात्र, पावसाअभावी नदी-नाले कोरडे राहिले, तर विहिरी आणि विंधन विहिरींच्या पाणीपातळीतही अपेक्षित वाढ झाली नाही. उपलब्ध पाण्यावर त्यांनी आतापर्यंत पीक जोपासले; मात्र अखेरच्या टप्प्यात पाण्याची गरज वाढल्याने अडचणी गंभीर झाल्या आहेत.
पाणीटंचाईमुळे मोरे यांना तीन एकरांपैकी केवळ दीड एकरावरील कांदा जगविण्याचा निर्णय घ्यावा लागला. उर्वरित दीड एकरावरील पीक सोडून देण्याची वेळ आली आहे. सात हजार लिटरच्या टँकरसाठी दीड हजार रुपये मोजावे लागत आहेत. दहा टँकर पाणी विहिरीत टाकून रेनपाइपद्वारे एका एकराला पाणी द्यावे लागत असून, त्यासाठी सुमारे १५ हजार रुपये खर्च येत आहे. अडीच महिन्यांचे झालेले पीक परिपक्वतेच्या टप्प्यावर असल्याने पाणी न मिळाल्यास उत्पादन घटण्याची भीती आहे.
पांढरी येथील शेतकरी शरद घावटे यांनाही एका एकरातील कांदा पिकाला पाणी देण्यासाठी सुमारे तीन हजार रुपये खर्च करावा लागत आहे. परिसरात पांढरी साठवण तलाव असूनही शेतीसाठी पाण्याची टंचाई जाणवत आहे.
---
विंधन विहिरींचाही आधार नाही
उन्हाचा चटका वाढत असताना पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. पर्यायी पाण्याचे स्रोत मिळविण्यासाठी विंधन विहिरी खोदल्या जात आहेत; मात्र अनेक ठिकाणी पाणी लागत नसल्याने निराशा पदरी पडत आहे. पूर्वी द्राक्षबागांसाठी टँकरने पाणी देण्याची वेळ येत होती; आता कांदा पिकासाठीही पाणी विकत घ्यावे लागत आहे. पांगरी मंडलातील या परिस्थितीमुळे घटते जलसाठे आणि पावसाची अनिश्चितता यांचा शेतीला बसणारा फटका स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com