धक्कादायक, इंदापुरात वडिल व मुलाचा कोरोनाने मृत्यू

राजकुमार थोरात
Wednesday, 2 September 2020

इंदापूर तालुक्यात गेल्या आठ- दहा दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बेलवाडी येथील ४४ वर्षाच्या प्राथमिक शिक्षकाला 23 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती.

वालचंदनगर (पुणे) : इंदापूरच्‍या पश्‍चिम भागातील बेलवडी येथील वडिल व मुलाचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाला. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इंदापूर तालुक्यात गेल्या आठ- दहा दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बेलवाडी येथील ४४ वर्षाच्या प्राथमिक शिक्षकाला 23 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कातील हायरिस्क व लो रिस्कमधील नागरिकांचे नमुने घेण्यात आले होते. यामध्ये कुटुंबातील चौघा जणांची तपासणी केल्यानंतर वडिलांचा (वय 72) कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर, पत्नी व दोन मुलींचा अहवाल निगेटिव्ह आला. वडिल व मुलावर बारामतीमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. वडिलांच्या रक्तामधील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने चिंतेचा विषय झाला. अखेर रविवारी (ता. ३० ऑगस्ट) वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाच्याही रक्तातील ऑक्सिजनचे कमी झाले. त्यामुळे वडिलांपाठोपाठ मंगळवारी (ता. 1) मुलाचा मृत्यू झाला. 

पुणे जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटेना

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील वालचंदनगरमधील दोन सख्ख्या भावांचा यापूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर बेलवाडीमधील वडिल व मुलाच्या मृत्यूची घटना तालुक्यातील नागरिकांच्या मनाला चटका लावून गेली. बेलवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

कोरोना रुग्णांची हजाराकडे वाटचाल 
इंदापूर तालुक्यामध्ये आज कोरोनाचे नव्याने ४१ रुग्ण आढळले. इंदापूर तालुक्यातील कोराना रुग्णाचा आकडा ९१६ वरती पोहचला आहे. यामध्ये अॅक्टिव्ह रुग्ण ३५१ असून, आजपर्यंत ३८ रुग्णाचा मृत्यू झाला असून, ५२७ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father and son die of corona in Indapur taluka