पुणे : धनकवडीत आठ वर्षाच्या मुलीचा खून करून पित्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

पुणे : धनकवडीत आठ वर्षांच्या मुलीचा गळा आवळून पित्याने खून केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. मुलीचा खून केल्यानंतर पित्याने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

पुणे : धनकवडीत आठ वर्षांच्या मुलीचा गळा आवळून पित्याने खून केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. मुलीचा खून केल्यानंतर पित्याने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

श्रद्धा आशिष भोंगळे (वय 8, रा. काशिनाथ पाटीलनगर, धनकवडी) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. तिचा खून करून आशिष भोंगळे (वय 49) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष भोंगळे चालक होता. कौटुंबिक वादामुळे त्याची पत्नी नांदत नाही. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे.

आशिष, त्याची आई, मुलगा आणि मुलगी धनकवडीत राहायला आहेत. शनिवारी सायंकाळी आशिषची आई कामानिमित्त बाहेर पडली, त्या वेळी श्रद्धा आणि आशिष घरात होते. आशिषने श्रद्धाचा गळा दाबून खून केला, त्यानंतर साडी पंख्याला बांधून गळफास घेतला. काही वेळानंतर आशिषची आई घरी आली, तेव्हा श्रद्धा बेशुद्धावस्थेत असल्याचे निदर्शनास आले व आशिषने गळफास घेतला होता. या घटनेनंतर दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

श्रद्धाचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले. त्यानंतर रविवारी रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय पुराणिक यांनी घटनास्थळी भेट दिली. 

कौटुंबिक वादातून घटना 
आशिषची पत्नी दोघांमधील वादामुळे नांदत नव्हती, त्यामुळे कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: father suicide after 08 year old girl murder in Dhankawadi pune