स्पर्धा परीक्षा अभ्यासाच्या वास्तवावर प्रकाश

ब्रिजमोहन पाटील/महेश जगताप
Monday, 28 September 2020

 ‘सकाळ’ने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्‍न मांडून मनातील घुसमटीला वाट मोकळी करून दिली, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

पुणे - ‘कोरोना’मुळे आमच्या समोर प्रश्‍न काय आहेत, मानसिक स्थिती कशी आहे, बदलत्या स्थितीत अभ्यास कसा करत आहोत आणि आमच्याकडून असलेल्या अपेक्षा याबद्दल कोणालाच काही बोलता येत नव्हते. मात्र, ‘सकाळ’ने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्‍न मांडून मनातील घुसमटीला वाट मोकळी करून दिली, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 

स्पर्धा परीक्षेचे हब असलेल्या पुण्यातील वास्तव ‘सकाळ’ने पाच भागांच्या मालिकेतून समोर आणले. विद्यार्थ्यांसह क्‍लासचालक, पुस्तकविक्रेते, मेसचालक आदी व्यावसायिकांची कैफियत मांडताना त्यांनी केलेला बदलही स्पष्ट केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) पुढील वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाने वेळापत्रक दिले पाहिजे. निकाल वेळेवर लावला पाहिजे. परीक्षा पद्धतीत बदल करताना विद्यार्थ्यांना विचारात घेतले पाहिजे. असे केल्यास आयोगाचा कारभार सुरळीत चालेल व विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ होईल.
- सागर माने, विद्यार्थी

कोरोनाच्या काळात स्पर्धा परीक्षेमध्ये टिकणे खूप अवघड झाले आहे. पण पाठीमागे वळून पाहिलं तर अंधार आणि पुढेही अंधार. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही. पण या काळात क्‍लासचालक, रूममालक यांनी विद्यार्थ्यांना थोडंसं समजून घेण्याची गरज आहे.
- विशाल गाढवे, विद्यार्थी 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे विद्यार्थ्यानी आपण जेथे आहोत तेथेच राहूनच अभ्यास केला पाहिजे, त्यासाठी ऑनलाइन साहित्य उपलब्ध आहेच. पण यापूर्वी स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्यांकडून मार्गदर्शन घेतल्यास त्यातून चांगला निकाल लागेल.
- गजानन चव्हाण, विद्यार्थी

महाराष्ट्रात तीन ते चार लाख विद्यार्थी ‘एमपीएससी’च्या परीक्षांची तयारी करत असतात. रात्रंदिवस अभ्यास करतात. पदभरतीचा भरवसा नाही, त्यामुळे आमच्यावर याचा वाईट परिणाम होत आहे. याचा गंभीरपणे विचार शासनाने करण्याची गरज आहे.
- सुनील राठोड, विद्यार्थी

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी, आव्हाने याकडे लक्ष जात नाही; पण ‘सकाळ’ने मालिकेच्या माध्यमातून वास्तव मांडले आहे. पालकांनी मुलींना अधिकारी होण्यासाठी संधी दिली पाहिजे, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंखांना बळ दिले तर त्या नक्कीच यशस्वी होतील. हा मुद्दा माडंल्याबद्दलही ‘सकाळ’चे आभार.
- महेश बडे, प्रतिनिधी, एमपीएससी स्टुडंट्‌स राइट्‌स

परीक्षेबाबत अनिश्‍चितता, वाढते वय, सामजिक अवहेलना यास तरुणांना तोंड द्यावे लागत आहे. शासनाने पुढील वर्षासाठीही जाहिरात काढून वेळापत्रकानुसार परीक्षा घ्यावी, राज्यातील तरुणांना न्याय दिला पाहिले. स्पर्धा परीक्षेचे वास्तव मांडून ‘सकाळ’ने तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्याबद्दल आभार.
- सनी चव्हाण, विद्यार्थी 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

विद्यार्थ्यांनो याचाही विचार करा 
करमाळा तालुक्‍यातील बाळासाहेब काळे यांची शेती आहे. त्यांचा मोठा मुलगा पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. त्यांनी त्याला स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी सहा वर्षे दिली. त्यावर ते म्हणाले, ‘‘माझा मुलगा अधिकारी झाला तर मला आनंद आहेच, पण तो झाला नाही तरी मला फार दुःख नाही. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना त्याला मिळालेले ज्ञान वाया जाणार नाही. तो आयुष्यात दुसरे काही तरी चांगले करू शकतो. अनेक पालकांची आर्थिक स्थिती नाजूक असताना ते कर्ज काढून विद्यार्थ्यांना अधिकारी बनविण्याचे स्वप्न बघतात. त्यामुळे त्यांना अपेक्षा असणे सहाजिकच आहे. अशा स्थितीत मुलांनी पालकांच्या मनस्थितीचा विचार करून त्यांनाही आधार दिला पाहिजे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: feelings of students studying for competitive exams