

नसरापूर, ता. ८ : रासायनिक व खत मंत्रालयाच्या वतीने विकसित केलेल्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलाझर सेल’ (एफएफएस) या डिजिटल ॲपद्वारे खत नोंदणी व खरेदीचे प्रशिक्षण न्हावी (ता. भोर) येथे शनिवारी (ता.७) पार पडले. या प्रशिक्षणामुळे अनुदानित खतांचा काळाबाजार रोखण्यास मदत होणार आहे.
न्हावी येथील विशाल कृषी सेवा केंद्र येथे आयोजित या प्रशिक्षणास कृषी विकास अधिकारी अजित पिसाळ, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धनंजय पाटील, तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी, तालुका गुणनियंत्रण निरीक्षक कृषी अधिकारी सुरज पाटील, राजगड सहकारी साखर कारखाना संचालक दत्तात्रेय चव्हाण, माजी संचालक रविकांत सोनवणे, न्हावी विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन नवनाथ सोनवणे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी खताची हमी, योग्य किंमत आणि रांगेतून मुक्ती मिळणार असून शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांनी केले आहे.
या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या खत बुकिंग करता येणार असून, रांगेत उभे राहण्याची गरज उरणार नाही. प्रशिक्षणादरम्यान ग्राम संग्राम निगडे व शिवाजी निगडे यांनी १८ बॅग युरिया, ८ बॅग १०:२६:२६ व ८ बॅग अमोनियम सल्फेट ऑनलाइन खरेदी केले. तसेच १४ शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. निखिल चव्हाण यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
अशी आहे ‘एफएफएस’ प्रणाली:
१. बुकिंग: शेतकरी मोबाईल ॲप किंवा महा-ई-सेवा केंद्रावरून खतांचे आगाऊ बुकिंग करू शकतात.
२. पडताळणी: हे ॲप जमिनीच्या नोंदींशी जोडलेले असून, जमीन रेकॉर्डमध्ये नसल्यास ती जोडण्याची सोय आहे.
३. टोकन: मागणी नोंदवल्यानंतर टोकन नंबर आणि क्यूआर कोड तयार होतो.
४. खरेदी: हा कोड खत विक्रेत्याकडे दाखवून, पॉस मशिनवर अंगठ्याचा ठसा देऊन सरकारी दरात खत मिळवता येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.