

पंधरा ऑगस्टपासून १० जिल्ह्यांत
‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रकल्प
विदर्भात वाशीम, गडचिरोलीची निवड
अॅग्रोवन वृत्तसेवा
अकोला : केंद्र शासनाच्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ या अनुदानित रासायनिक खत विक्री व्यवस्थेतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी १५ ऑगस्ट २०२६ पासून राज्यातील आणखी १० जिल्ह्यांत करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांच्या कृषी अधिकाऱ्यांची ऑनलाइन आढावा बैठक सोमवारी (ता. ३) घेण्यात आली. अमरावती विभागातून वाशीम, तर नागपूर विभागातून गडचिरोली जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. एफएसएएस (FSAS) ॲपच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
केंद्र शासनाने ५ जून २०२६ पासून राज्यात छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ हा पथदर्शी प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला आहे. या प्रकल्पाच्या अनुभवाच्या आधारे आता दुसऱ्या टप्प्यात त्याचा विस्तार करण्यात येत असून, १५ ऑगस्टपासून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, लातूर, वाशीम आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या संदर्भात कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.
या प्रकल्पामुळे शेतकरी घरबसल्या कोणत्या खत विक्रेत्याकडे किती खतसाठा उपलब्ध आहे, याची माहिती मिळवू शकणार आहे. तसेच त्यांच्या क्षेत्रानुसार अनुदानित खतांची उपलब्धता निश्चित केली जाईल. युरिया आणि डीएपीसारख्या खतांच्या वितरणासाठी क्षेत्रनिहाय अप्पर कॅप निश्चित करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना मोबाईलच्या माध्यमातून सुलभरीत्या अनुदानित खते उपलब्ध करून देण्यासाठी हा डिजिटल प्रकल्प राबविण्यात येत आहे. याद्वारे शेतकरी घरबसल्या खतांचे आगाऊ बुकिंग करू शकतात. त्यामुळे रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही आणि क्यूआर कोडद्वारे पारदर्शक पद्धतीने खतांचे वाटप केले जाईल. नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्याला तीन दिवसांपर्यंत खत उचलण्याची मुभा असेल. फार्मर आयडीचा वापर करून नोंदणी केल्यास प्रक्रिया अधिक सुलभ होईल. फार्मर आयडी नसल्यासही शेतकरी नोंदणी करू शकणार आहे.
प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली ही नवी व्यवस्था आता दुसऱ्या टप्प्यात आणखी जिल्ह्यांमध्ये विस्तारली जात आहे. या प्रणालीमुळे अकृषी वापरासाठी होणाऱ्या खतांच्या वापराला तसेच शेतकऱ्यांवर अनावश्यक खते लादण्याच्या प्रकारांना आळा बसेल. परिणामी, खत विक्री व्यवस्थेत अधिक पारदर्शकता, सुलभता आणि शिस्त येईल, असा दावा कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.