शहरात दोनदिवसीय "फेस्टिव्हल ऑफ द फ्युचर' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

 महापालिकेतर्फे शुक्रवारी (ता. 28) आणि शनिवारी (ता. 29) आंतरराष्ट्रीय "पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल ऑफ द फ्युचर' या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

पिंपरी  - महापालिकेतर्फे शुक्रवारी (ता. 28) आणि शनिवारी (ता. 29) आंतरराष्ट्रीय "पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल ऑफ द फ्युचर' या उपक्रमाचे आयोजन केले आहे. युवा उद्योजकांना प्रेरणा मिळावी, नव्याने उद्योग उभारणाऱ्या युवकांना प्रोत्साहन द्यावे, कौशल्यविकासाला गती मिळावी, नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, याचबरोबर पर्यावरणपूरक शहराची निर्मिती व्हावी, असे यामागील उद्देश आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

चिंचवडमधील ऑटो क्‍लस्टरच्या सभागृहात दोन दिवस चालणाऱ्या या उपक्रमामध्ये राज्यभरातून सुमारे एक हजार स्टार्टअप उद्योजक सहभागी होणार आहेत. उद्योजक आणि विविध क्षेत्रांत काम करणारे तज्ज्ञही सहभागी होतील. यात 20 स्टार्टअप उद्योगातील व्यावसायिकांनी केलेल्या प्रकल्पांचे प्रदर्शन भरविण्यात येईल. नव्या कंपन्यांना आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग करण्याबरोबरच अनेकांना गुंतवणूकदार, व्यावसायिक भागीदार या उपक्रमातून मिळविण्याची संधी असेल. 

या उपक्रमामध्ये नागरिकांनी नावीन्यपूर्ण कल्पनांवर विचार करावा आणि अडचणींवर उपाययोजना सुचवाव्यात, यासाठी सिटिझन हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेकडून हॅकेथॉन विजेत्याला नऊ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. 

"स्टार्टअप पिचफेस्ट'चे आयोजन 
शहराचा विकास करण्यासाठी सरकारकडून स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत, अमृत, आयुष्यमान भारत असे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे या उपक्रमामध्ये नवीन संशोधन आणि स्टार्टअपसंबंधित उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. स्टार्टअप कंपन्या यशस्वी व्हाव्यात म्हणून "स्टार्टअप पिचफेस्ट'चे आयोजन करण्यात येणार असून, त्या माध्यमातून नव्या उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

हे आहेत वक्ते...
डॉ. रघुनाथ माशेलकर
 आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च (सीएसआयआर) या संस्थेचे मजी महासंचालक. इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडमी, इन्स्टिट्यूशन ऑफ केमिकल इंजिनअर्स, ग्लोबल रिसर्च अलायन्स या संस्थांचे अध्यक्ष म्हणूनही काम. ॲकॅडमी ऑफ सायटिंफिक अँड इनोव्हेटिव्ह रिसर्च संस्थेचे पहिले अध्यक्ष.

नय्या सग्गी
बेबीचक्रच्या मुख्य कार्यकारी अधिकारी. हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएम. पालकत्व आणि मुलांची काळजी घेण्याबाबत त्यांनी २०१४ मध्ये सहप्रवर्तक मोहित कुमार यांच्या मदतीने बेबीचक्रची स्थापना. त्यांनी सुरू केलेला बेबीचक्र ॲप दर महिन्याला साडेसात हजार पालक डाऊनलोड करतात. 

अक्षय मल्होत्रा 
अर्ली सॅलरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहप्रवर्तक. नोकरदारांसाठी विविध ॲप्लिकेशन तयार करण्याचे काम करतात. मार्केटिंगसाठी सोपे पर्याय देण्यात त्यांचा हातखंडा. फिनटेक या स्टार्टअप कंपनीचीही सुरुवात. 

डॉ. अपूर्व शर्मा 
व्हेंचर कॅटलिस्ट या संस्थेचे अध्यक्ष. देशात स्टार्टअप इकोसिस्टिम सुरू करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका. स्टार्टअपसाठी आवश्‍यक असणारी गुंतवणूक, भांडवल, याबाबत त्यांचा अभ्यास, अनेकांना मदत.

विन्नी पॅट्रो
सार्वजनिक उपक्रम, व्यावसायिक सल्लागार, या क्षेत्रात दहा वर्षांहून अधिक काळ काम. नेतृत्वकौशल्य विकसित करण्यासाठी आवश्‍यक असणारे मार्गदर्शन देण्यामध्ये त्यांचा हातखंडा. सध्या डॉ. अरुणाचलम मुरुगनथम यांच्या सल्लागार म्हणून काम. आत्तापर्यंत तीन हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

हणमंत गायकवाड
भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेड या कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष. त्यांची कंपनी सेवा क्षेत्रात कार्यरत. भारताबरोबरच अन्य देशांमध्येही कंपनीचे काम. कौशल्यविकास क्षेत्रातही त्यांचा लौकिक. राष्ट्रपती भवन व पंतप्रधान कार्यालयातही त्यांची सेवा.

लोव्हीना 
एव्हरीथिंग एक्‍सपेक्टस इंडिया या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी. कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांसाठी काम. अमेरिकेमध्ये रिअल इस्टेट एजंट, कम्युनिकेशन डायरेक्‍टर आणि इव्हेंट मॅनेजर म्हणून परिचित. अर्थशास्त्र पदव्युत्तर व मार्केटिंगमध्ये एमबीए.

जे. ए. चौधरी
एसटीपीआय बेंगळुरूचे संस्थापक संचालक. सॉलिड स्टेट इलेक्‍ट्रॉनिक्‍समध्ये एम. टेकची चेन्नई आयआयटीमधून पदवी. इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून सुरुवात. भारत हेवी इलेक्‍ट्रिकल लिमिडेटमध्ये काम.

सिद्धार्थ देशमुख
जिनिअस स्पोर्टसचे दक्षिण अशिया विभागाचे प्रिसिंपल कन्सलटंट. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी अनेक ठिकाणी जबाबदारी. क्रीडा व्यवसायाच्या क्षेत्रात चांगला अभ्यास. अनेक उपक्रम राबविले आहेत.

संदेश सॅलियन
डाली अँड समीर इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक. त्यांच्याकडे वित्त आणि व्यावसायिक विभागाची जबाबदारी. ब्रिटनमधून एमबीएचे शिक्षण.

विशाल गोंडल  
गोक्‍यूई संस्थेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी. नुकतीच त्यांनी इंडियागेम या संस्थेची स्थापना केली. इंडियन इंटरप्रेनियरचे गुंतवणूकदार. 

उदयन कानडे  
ऑनिरिस्क लॅबचे मुख्य कार्यकारी अधिकारी. अभियांत्रिकी क्षेत्रात अनेक उपक्रम राबविले. कॉडिटो टेक्‍नॉलॅजीचे मुख्य शास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Festival of the Future in the PCMC City