#PuneCrime : तळजाई वसाहतीत ५० गाड्यांची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

तळजाई वसाहत झोपडपट्टीमध्ये अज्ञात गुंडांनी ४० ते ५० वाहनांची तोडफोड केली. शनिवारी पहाटे दोन ते अडीचच्या दरम्यान ही घटना घडली. या वाहनांमध्ये टेंपो, रिक्षांसह अन्य वाहनांचा समावेश आहे.

सहकारनगर - तळजाई वसाहत झोपडपट्टीमध्ये अज्ञात गुंडांनी ४० ते ५० वाहनांची तोडफोड केली. शनिवारी पहाटे दोन ते अडीचच्या दरम्यान ही घटना घडली. या वाहनांमध्ये टेंपो, रिक्षांसह अन्य वाहनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या वाहनांवरच अनेकांचा उदरनिर्वाह चालत असल्याने त्यांच्यापुढे रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी हेमंत इंगळे  (वय ४६) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तळजाई वसाहतीमधील जय अंबे चौक ते एकता चौक परिसरातील नागरिकांनी नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री रस्त्याच्या कडेला त्यांची वाहने लावली होती. दरम्यान, पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी लोखंडी सळईने वाहनांची तोडफोड केली. त्यामध्ये तीन रिक्षा, चार टेंपो व ३० हून अधिक दुचाकींचे नुकसान झाले. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी सहकारनगर पोलिसांना खबर दिली. त्यानंतर पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलिस आयुक्त सर्जेराव बाबर, सहकारनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई, पोलिस उपनिरीक्षक गौरव देव यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

बांधकाम मजूर, पेंटर, पथारी व्यावसायिक, कचरावेचक, रिक्षाचालक, टेंपोचालक अशा नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह या वाहनांवरच चालतो. मात्र, त्याच वाहनाची तोडफोड झाल्यामुळे आता ते नुकसान कोठून व कसे भरून काढायचे, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित करीत पोलिस ठाण्यासमोर संताप व्यक्त केला. दरम्यान, घटनास्थळी यापूर्वी सीसीटीव्ही लावले होते. मात्र, काहींनी ते फोडले, तर सीसीटीव्हीच्या परिसरातील वाहने सुरक्षित असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

गाड्यांच्या तोडफोड प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू असून, रात्री उशिरापर्यंत आरोपींना अटक केली जाईल. यापुढे घटना घडणार नाहीत, यासाठी उपाययोजना केल्या जातील.
- सर्जेराव बाबर,  सहायक पोलिस आयुक्त 

आमच्या घरासमोर उभ्या असलेल्या दोन दुचाकींचीही तोडफोड झाली. तळजाई वसाहतीमध्ये सातत्याने अशा घटना घडत आहेत.
- अकील शेख, रहिवासी

नेहमीप्रमाणे शनिवारी दिवसभर काम केल्यानंतर रात्री मी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. मध्यरात्रीच्या सुमारास गुंडांनी गाडी फोडून नुकसान केले.
- गणेश धेडे, रिक्षाचालक

मद्यपी, गर्दुल्ल्यांना आवरणार कोण?
संबंधित घटना घडली, त्याच ठिकाणी दोन वर्षांपूर्वी ५५ वाहनांचे सीट कव्हर फाडून टाकण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आज पुन्हा गुंडांनी वाहनांची तोडफोड करून आपले उपद्रवमूल्य सिद्ध केले आहे. याबरोबरच तळजाई वसाहतीमधील शौचालये, मंदिर परिसर यांसह अन्य ठिकाणी गर्दुल्ले व मद्यपींचा वावर असतो. त्यांच्याकडून महिला व तरुणींना त्रास होत असतो. तसेच, वाहनांचे नुकसानही केले जाते. मात्र, त्यांच्याविरुद्ध कुठलीच ठोस कारवाई होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

वारज्यात टोळक्‍याकडून सहा वाहनांचे नुकसान
पुणे - शस्त्रधारी टोळक्‍याने रस्त्याच्या कडेला लावलेली स्कूल व्हॅन, दुचाकी व रिक्षा अशा सहा वाहनांची तोडफोड केली. तसेच, आरडाओरडा करीत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी रात्री दहा वाजता वारजे येथे घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी धनंजय ढावरे (वय ३९, रा. वारजे माळवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यावरून विशाल अशोक सोनवणे (वय २४, रा. सुयोगनगर, वारजे) याच्यासह चौघांना अटक केली. फिर्यादी काळूबाई मंदिर परिसरात राहतात. ते स्कूल व्हॅनचालक आहेत. शुक्रवारी रात्री तोंडओळखीच्या एका व्यक्तीसह सहा ते सात जणांचे टोळके हातामध्ये कोयते, दांडके घेऊन आले. आरडाओरडा करीत परिसरात थांबलेल्या लोकांना फोडा, अशी धमकी देत शिवीगाळ केली. यानंतर फिर्यादीच्या स्कूल व्हॅनच्या काचा फोडल्या. त्यानंतर आरोपींनी यशोदीप चौक, परमार्थ निकेतन येथे जाऊन रमेश सईने यांच्या दोन दुचाकी, सिमरन शेलार, पूजा भोज यांची प्रत्येकी एक दुचाकी व रवींद्र शिंदे यांची रिक्षा, अशा सहा वाहनांची तोडफोड केली. एकमेकांवर असलेल्या रागातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.  

कमला नेहरू रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये लावलेली चाराचाकी अनोळखी व्यक्तींनी फोडली. त्यामध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी संतोष धायबर यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty vehicles Todphod in talajai area