
एकमेकांवर तलवार, काट्या व कुऱ्हाडीसारख्या धारधार शस्त्रांचा वापर झाल्याने संबंधित जखमींच्या डोक्यासह पाटीवर, हातावर खोलवर जखमा झाल्या आहेत.बारामती शहरातील खासगी रुग्णालयात जखमींवर पुढील उपचार सुरू आहेत.
माळेगावमध्ये तुंबळ हाणामारी; तलवार, काट्या, कुऱ्हाडी शस्राने वार
माळेगाव : बारामती तालुक्यात माळेगाव बुद्रूक ते साखर कारखानारोड लगत मोरे व गव्हाणे कुटुंबियांमध्ये धारधार शस्त्राने तुबळ हाणामारी झाली .गव्हाणेवस्ती येथे नव्याने टाकलेल्या पाण्याच्या पाइपलाइवरून शेण खताचा ट्रॅक्टर का घातला, या कारणावरून ही मारामारी झाली.
एकमेकांवर तलवार, काट्या व कुऱ्हाडीसारख्या धारधार शस्त्रांचा वापर झाल्याने संबंधित जखमींच्या डोक्यासह पाटीवर, हातावर खोलवर जखमा झाल्या आहेत. त्यामध्ये भाऊसाहेब नामदेव गव्हाणे, महादेव भाऊसाहेब गव्हाणे, ज्योती महादेव गव्हाणे, गणेश संजय गव्हाणे, प्रशांत मोरे, टाॅम मोरे, आकाश मोरे इत्यादी जण गंभीर जखमी झाले आहेत. बारामती शहरातील खासगी रुग्णालयात जखमींवर पुढील उपचार सुरू आहेत.
मंगळवार (ता. १६) रोजी सायंकाळच्यावेळी वरील घटना घडली. या घटनेचे पडसाद माळेगाव बरोबर संबंधित कुटुंबियांच्या नातेवाईक व मित्रपरिवारापर्यंत पोचल्याने पुन्हा मध्यरात्री गव्हाणे वस्तीवर हाणामारी झाली, फोरव्हिलर गाड्यांचा काचा फोडण्यात आल्या. परिणामी बुधवारी दुपारपर्य़ंत गावात दहशतीचे वातावरण पसरले होते.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सहाय्यक पोलिस निरिक्षक महेश इदाते यांनी गावात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवल्याचे दिसून आले. दरम्यान, जखमी गव्हाणे कुटुंबियांच्यावतीने राहुल गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे तालुका पोलिसांनी प्रशांत मोरे, टाॅम मोरे, आकाश मोरे व इतर अनोळखी इसमावर जीवे मारण्याचा प्रय़त्न केल्याचा गुन्हा दाखल केला. तसेच दहशत माजवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचाही सदर गुन्ह्यामध्ये समावेश आहे.
दुसरीकडे, प्रशांत मोरे यांनीही गव्हाणे कुटुंबियांविरुद्ध खुनी हल्ला केल्याची फिर्याद दिल्याचे सांगण्यात आले. विशेषतः वरील प्रकरणात गव्हाणे व मोरे या दोन्ही कुटुंबियांनी परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरिक्षक महेश इदाते पुढील तपास करीत आहेत.