संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

निलंबित फौजदाराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

Published on

पुणे, ता. २६ ः रेमडेसिव्हिरची बेकायदा विक्री केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या नातेवाइकांसमवेत पार्टी करून गुन्हे शाखेच्या एका पोलिस उपनिरीक्षकाने त्यांच्याच अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी संबंधित पोलिस उपनिरीक्षकाचे निलंबन केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पॉक्‍सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दीपक माने असे या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध २१ वर्षीय तरुणीने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन लहान मुलांचे लैंगिक शोषण व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पॉक्‍सो) व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

माने हा गुन्हे शाखेच्या युनिट चारमध्ये कार्यरत होता. बालेवाडी परिसरात दोन भावांना रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन बेकायदा विकताना पकडले होते. तपासादरम्यान, मानेची आरोपीच्या नातेवाइकांशी ओळख झाली होती. दरम्यान, माने २० एप्रिलला आरोपींच्या नातेवाईक व फिर्यादीच्या दाजीच्या फ्लॅटवर पार्टी करण्यासाठी गेला होता. तेथे माने व फिर्यादीचा दाजी दारू पीत बसले होते. त्याने फिर्यादी व फिर्यादीच्या बहिणीला तेथे बोलावून घेतले. माने याने मद्यधुंद अवस्थेत तिच्याशी अश्लील वर्तन करून तिची छेडछाड काढली. तसेच सर्वांना आरोपी करतो, अशी धमकी दिली. या घटनेची माहिती एका महिलेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यास दिली. या तक्रारीनुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये माने दोषी आढळल्याने त्यास निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Marathi News Esakal
www.esakal.com