esakal | आधी खड्डे बुजवा मग पुढचे काम करा; प्रशासनाला आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Pune PMC

आधी खड्डे बुजवा मग पुढचे काम करा; प्रशासनाला आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात पडलेल्या खड्ड्यांची जबाबदारी आमची असल्याचे स्थायी समिती अध्यक्षांनी मान्य केल्यानंतर आता हे खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरण्यास सुरवात केली आहे. शहरात समान पाणी पुरवठा योजनेसाठी सुरू असलेले खोदकाम त्वरित थांबवा, जेथे जेथे खड्डे पडले आहेत, ते त्वरित चांगल्या दर्जाचे काम करून बुजवा मगच पुढचे काम हातात घ्या, असे आदेश दिले आहेत. दरम्यान, शहरात काम व्यवस्थित होत नसल्याने समान पाणी योजनेच्या अधिकाऱ्यांची व कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक गुरुवारी होणार आहे. (Fill pits first then order next work hemant rasane order administration)

एप्रिल मे महिन्यात शहरातील सर्वच भागात सांडपाणी वाहिनी, पाणी पुरवठा वाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले. रस्ते खोदल्यानंतर हे खड्डे संबंधित ठेकेदाराकडूनच बुजवून घेण्याची जबाबदारी प्रशासनावर होती. पावसाळा सुरू झाल्यानंतर सांडपाणी वाहिन्यांचे काम थांबविण्यात आले आहे. पण समान पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू ठेवण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडल्याने यापूर्वी दुरुस्त केलेल्या रस्त्यांची चाळणी झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांची तारेवरची कसरत होत आहे, शिवाय वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

हेही वाचा: माळेगावच्या गोळीबार प्रकरणात माजी सरपंचांना जामीन मंजूर

स्थायी समितीच्या बैठकीत पुढील १५ दिवसात सर्व रस्ते दुरुस्त करा असे आदेश प्रशासनाला देण्यात आले. तसेच खड्ड्यांची जबाबदारी सत्ताधाऱ्यांनी स्वीकारून रस्ते दुरुस्त करू असे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर बुधवारी प्रशासनास सर्व खोदाई थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

‘‘रस्ते खोदाई नंतर योग्य पद्धतीने रस्ते बुजविले नाहीत अशा अनेक तक्रारी येत आहेत. रस्त्यावर राडारोडा पडलेला आहे. नागरिकांना त्रास होत असल्याने शहराच्या सर्व भागातील रस्ते खोदाई थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेथे रस्ते खराब झाले आहेत ते आधी चांगल्या पद्धतीने बुजवा त्यानंतरच पुढच्या कामाचे नियोजन करा. यासंदर्भात उद्या बैठक देखील होणार आहे," असे स्थायी समिती अध्यक्ष यांनी हेमंत रासने यांनी सांगितले.

loading image
go to top