पुण्यातील विद्यार्थ्यांची फिल्म युनायटेड नेशनमध्ये दाखवणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

इंटरनॅशनल एज्युकेशन अॅण्ड रिसोर्स नेटवर्क (आय अर्न) इंडिया या संस्थेच्या पुणे शाखेच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली 'ब्रेक द बायस' ही फिल्म संयुक्त राष्ट्र संघाच्या(युनायटेड नेशन) बैठकीत दाखवली जाणार आहे. 

पुणे : ''जुळे मुलगा व मुलगी यांच्या आयुष्याच्या विविध टप्प्यावर लिंगभेदामुळे कसे परिणाम होतात. शेवटी हे सर्व बदलायला पाहिजे'', असा ते निर्णय घेतात, अशा आशयाची कथा मांडण्याचा प्रयत्न केलेल्या 'ब्रेक द बायस' ही फिल्म संयुक्त राष्ट्र संघाच्या(युनायटेड नेशन) बैठकीत दाखवली जाणार आहे. ही फिल्म इंटरनॅशनल एज्युकेशन अॅण्ड रिसोर्स नेटवर्क (आय अर्न) इंडिया या संस्थेच्या पुणे शाखेच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली आहे. 

तिसऱ्या 'माय वर्ल्ड 360 डिग्री'च्या यादीत सहभागी होण्यासाठी 24 देशातल्या युवकांनी 76 फिल्म पाठविल्या होत्या. त्यातील 9 चित्रफिती निवडण्यात आल्या, त्यामध्ये देशातून एकमेव 'ब्रेक द बायस' या चित्रफितीची निवड करण्यात आली. संयुक्त राष्ट्राच्या न्यूयॉर्क येथील मुख्य कार्यालयात येत्या 23 ते 27 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या 'शाश्‍वत विकास ध्येये' या परिषदेत ही चित्रफीत दाखविण्यात येणार आहे.

जागतिक आरोग्य संस्थेने 17 शाश्‍वत विकास ध्येये निर्देशित केली आहेत. त्यापैकी ध्येय 3- आरोग्य व निरामयता व ध्येय 5- लिंग समानता या दोन ध्येयावर आय अर्नमधील मुलांनी काम करत ही फिल्म बनवलेली आहे. या फिल्ममध्ये अनिश फणसळकर, मिहीर पोतनीस, साक्षी गाडगीळ यांचा प्रमुख सहभाग असून अवनी कोंडेजकर, रोहन धोत्रे, सुखदा भावे, चैतन्य मंत्री, सचित लेले, ओंकार जोशी, केतकी पाटेकर, अहना आगाशे हे सहकलाकाराच्या भूमिकेत आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The film made by Pune students will be screened in the United Nation