esakal | Video : अखेर, ढगाळ वातावरणातही पुणेकरांना दिसलं सूर्यग्रहण
sakal

बोलून बातमी शोधा

solar

ग्रहण सुरक्षितपणे कसे पाहावे? 
- "सोलार एक्‍लिप्स गॉगल'च्या साह्याने 
- सोलार फिल्टर टेलिस्कोप किंवा कॅमेऱ्याच्या साह्याने 
- पिनहोल कॅमेरा तयार करून 

Video : अखेर, ढगाळ वातावरणातही पुणेकरांना दिसलं सूर्यग्रहण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : यंदाच्या दशकातील शेवटचे सूर्यग्रहण पाहण्याची पुणेकरांची संधी जवळपास हुकलीच होती आहे. आज (गुरुवार) सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे पुणेकरांना सुर्याचे दर्शनच होईना. त्यात काही ठिकाणी पाऊसही पडला आहे. पण अखेर, ढगाळ वातावरणातही पुणेकरांना सुर्यग्रहण पाहायला मिळाले. 

पुण्यासह इतर शहरांमध्ये सूर्यग्रहण पाहण्याचा नागरिकांमध्ये उत्साह आहे. तब्बल दशकभराच्या प्रतीक्षेनंतर खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळाली आहे. सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी सूर्याला ग्रहण लागले आहे. त्याचा मध्य 9 वाजून 23 मिनिटांनी होईल, तर ग्रहणाचा शेवट 10 वाजून 57 मिनिटांनी होईल. बाजारात मिळणाऱ्या 'सोलार एक्‍लिप्स गॉगल' आणि दुर्बिणीच्या साह्याने नागरिक हे सूर्यग्रहण पाहत आहेत. याशिवाय, शहरात जागोजागी विविध खगोलप्रेमी संस्था आणि महाविद्यालयांनी ग्रहण पाहण्यासाठी व्यवस्था निर्माण केली आहे. 

सूर्याला ग्रहण कसे लागते 
सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्राची गोलाकार गडद सावली पृथ्वीवर पडते. यालाच आपण सूर्याला ग्रहण लागले, असे म्हणतो. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आणि पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे ही सावली वेगाने जमिनीवरून प्रवास करते. पृथ्वीच्या ज्या भागांवरून ही सावली प्रवास करते, त्या भागांमध्ये खग्रास किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते. म्हणजे, सूर्य अमावास्येच्या चंद्रामागे काही काळ लपलेला दिसून येतो. 

ग्रहण सुरक्षितपणे कसे पाहावे? 
- "सोलार एक्‍लिप्स गॉगल'च्या साह्याने 
- सोलार फिल्टर टेलिस्कोप किंवा कॅमेऱ्याच्या साह्याने 
- पिनहोल कॅमेरा तयार करून 

असे पाहणे धोकादायक 
- उघड्या डोळ्यांनी पाहणे 
- घरातील "एक्‍स रे' फिल्मच्या साह्याने 
- काळ्या काचेतून 
- काजळी लागलेल्या कागदातून 
- नेहमीचे गॉगल 
- सीडी किंवा फ्लॉपी 

असा बनवा "पिनहोल कॅमेरा' 
काळा कार्डशीट पेपर, फॉइल पेपर, ट्रेसिंग पेपर आणि फेविकॉल इतक्‍याच साधनांची "पिनहोल कॅमेरा' बनविण्यासाठी आवश्‍यकता असते. काळ्या कार्डशीट पेपरच्या नळीच्या एका बाजूला फॉइल पेपर, तर दुसऱ्या बाजूला ट्रेसिंग पेपर लावला जातो. फॉइल पेपरला पाडलेल्या छोट्याशा छिद्रातून सूर्याचा प्रकाश दुसऱ्या बाजूकडील ट्रेसिंग पेपरवर पडतो. ट्रेसिंग पेपरवर पडलेली सूर्याची उलटी प्रतिमा असते. याद्वारे सूर्यग्रहण पाहता येते.