हुश्श ! अखेर इयत्ता ११वीची प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून सुरू 

ब्रिजमोहन पाटील
Wednesday, 25 November 2020

शिक्षण उपसंचालक कार्यालय व इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीने सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे. २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते १ डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा पसंतीक्रम नोंदविता येणार आहे.

पुणे :  सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगिती मुळे 9 सप्टेंबरपासून इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली होती. अखेर याबाबत राज्य सरकारने 'एसईबीसी' गटातील विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याने २६ नोव्हेंबर (गुरूवार) पासून ११वीचा दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबविण्यात येणार आहे. 
 

शिक्षण उपसंचालक कार्यालय व इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीने सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे. २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते १ डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. ५ डिसेंबर रोजी दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना ९ डिसेंबर पर्यंत त्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चीत करणे आवश्यक आहे. १० डिसेंबर रोजी तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे, असे शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप यांनी स्पष्ट केले आहे. 

वेळापत्रक आणि आवश्यक कार्यवाही पुढील प्रमाणे 
२६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर 
- यापूर्वी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यासाठी इतर लागू होणारा प्रवर्ग निवडणेची सुविधा.
- विद्यार्थांना प्रवेश अर्ज भाग- एक मध्ये आवश्यकता असल्यास बदल करून घेणे आणि नियमित फेरी दोनसाठी पसंतीक्रम नोंदविणे (भाग-2 भरणे) तसेच यापूर्वी भरलेल्या भाग-दोन मधील पसंतीक्रम बदलता येतील. 
-  मार्गदर्शन केंद्र / माध्य शाळा यापूर्वी दिलेल्या सूचनानुसार विद्यार्थी अर्ज प्रमाणित व्हेरीफाय करतील.
-  या कालावधीत नवीन विद्यार्थी प्रवेश अर्ज भाग-1 व भाग-2 भरु शकतील,
-  व्यवस्थापन तसेच अल्पसंख्याक कोटातर्गत प्रवेशासाठी विद्यालयाना अर्ज मागविता येतील.
- प्रवेश अर्ज भाग-1 भरणे बंद होईल.
-  
२ डिसेंबर २०२०
- प्रवेश अर्ज भाग एक व्हेरीफाय करण्यासाठी शाळांना राखीव वेळ 
- विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येणे (प्रवेश अर्ज भाग दोन) व यापूर्वी भरलेला भाग दोन  मधील पसंतीक्रम बदलने बंद करणे. 

३ डिसेंबर ते ४ डिसेंबर २०२०
- डाटा प्रोसेसिंगसाठी राखीव वेळ
- पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी अंतिम करणे
- संबंधित विभागीय प्रवेश समित्यांनी अलोकेशन लाॅजीकनुसार परीक्षण करणे. 

५ डिसेंबर ते ९ डिसेंबर 

- नियमित प्रवेश फेरी-2 अंतर्गत प्रवेशासाठी गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे.
- विद्यार्थी लॉगीन मध्ये त्याला प्रवेशासाठी मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय दर्शविणे. 
- संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयास प्रवेशासाठी मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी कॉलेज लॉगीन मध्ये दर्शविणे.
- दुसऱ्या नियमित फेरीचे कट-ऑफ संकेतस्थळावर दर्शविणे. 
 विद्यार्थ्यांना याबाबत मोबाईल संदेश पाठविणे. 
- मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा असल्यास विद्यार्थ्याने प्रोसीड फाॅर अॅडमीशन करून प्रवेश निश्चित करणे.
- व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोटा प्रवेश सुरु राहतील.
- नवीन विद्यार्थी नोंदणी व प्रवेश अर्जाचा भाग-एक भरणे सुरु होईल. (पुढील प्रवेश फेरी साठी 

१० डिसेंबर
प्रवेशाची नियमित फेरी तीनसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे. 

विद्यार्थी व महाविद्यालयांसाठी महत्वाच्या सूचना
- सर्वोच्च न्यायालयाचे एसईबीसी संदर्भातील निर्णयामुळे प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवली होती. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशास विलंब झालेला किंवा यापूर्वी प्रवेश नाकारलेला आहे किंवा प्रथम पसंतीक्रम मिळूनही फेरी एक मध्ये प्रवेश घेतलेला नाही अशा प्रतिबंधित विद्यार्थ्यांनाही दुसऱ्या फेरी मध्ये सहभागी होता येईल. 
- विद्यार्थ्यांने नोंदणी केलेल्या पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळाल्यास त्यास प्रवेश घेणे बंधनकारक आहे.
- जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेरीमध्ये संधी दिली जाणार नाही. त्यांना केवळ विशेष फेरी मध्ये संधी मिळू शकेल.
- जर विद्यार्थ्यास घेतलेला प्रवेश रद्द करावयाचा असल्यास तशी विनंती संबंधित महाविद्यालयास करावी. तसेच या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विशेष फेरीपर्यंत थांबावे लागेल.
- उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी कोरोना च्या साथीमुळे त्यांचे प्रवेश शुल्क विद्यार्थ्यांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे. 

पुणे व पिंपरी चिंचवड मधील सद्यस्थिती 
महाविद्यालय - ३०४ 
प्रवेश क्षमता - १०७०३०
पहिल्या फेरीतील प्रवेश - ३०५५५
रिक्त जागा - ७६४७४


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally the admission process for class 11 will start from Thursday