esakal | पुण्यात रुग्ण फिरला तीन तास अन् उपचार पिंपरीत 
sakal

बोलून बातमी शोधा

sakal-exclusive

पुण्यातील कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेवरून लोकप्रतिनिधींनी स्थानिक प्रशासनाची झाडाझडती घेऊन काही तासही झाले नाही तेच पुन्हा रुग्णांचे हाल होत असल्याचे दिसून आले. 

पुण्यात रुग्ण फिरला तीन तास अन् उपचार पिंपरीत 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - तुमच्या रुग्णाला कोरोना संसर्गाचे निदान झालंय... कोविड रुग्णालय असले तरी येथे जागा नाही... तुम्ही त्याला तातडीने दुसरीकडे घेऊन जा... ती वेळ रात्रीच्या अडीच वाजल्याची होती... त्यानंतर तीन तास रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन शहरभर फिरत राहिली... अन शेवटी पिंपरीमध्ये रुग्णाला दाखल केले गेले. पुण्यातील कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेवरून लोकप्रतिनिधींनी स्थानिक प्रशासनाची झाडाझडती घेऊन काही तासही झाले नाही तेच पुन्हा रुग्णांचे हाल होत असल्याचे दिसून आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रुग्णाला कुठे घेऊन जायचे... कसे घेऊन जायचे... याची कोणतीही माहिती नाही. रुग्णालयामधील डॉक्‍टर बोलणे तर दूरच पण, दिसायलाही तयार नाहीत. अक्षरशः काकुळतीला येऊन कुठे घेऊन जाणार आता रुग्ण, असे नातेवाइकांनी विचारल्यानंतर तेथील एका कर्मचाऱ्याच्या तोंडून "वाघोलीला घेऊन जा', असा शब्द कानावर पडला. मग, प्रश्न आला रुग्णवाहिकेचा. ती मिळता मिळेना. मिळाल्यानंतर त्याच्या तोंडातून बाहेर पडलेल्या आकड्याप्रमाणे पैसे देऊन साडेतीन वाजता रुग्णाचा प्रवास वाघोलीच्या दिशेने सुरू झाला. वाघोलीतील तीन-चार रुग्णालयांची दारे ठोठावली. रुग्ण पॉझिटिव्ह आहे का, असा पहिला प्रश्न. "हो' उत्तर दिल्यावर "हे कोविड रुग्णालय नाही, दुसरीकडे घेऊन जा', असा सल्ला तेथील कर्मचारी देत. वाघोलीतील एका रुग्णालयामधील कर्मचाऱ्याने सांगितले, ""पुण्यात जागा मिळणार नाही. रुग्णाला पिंपरीला घेऊन जा.'' रुग्णवाहिका पिंपरीच्या दिशेने वळाली. त्याचबरोबर त्याचे भाड्याचे आकडेही वाढले. पिंपरीतील रुग्णालयामध्ये रुग्णाला दाखल केले, तेव्हा घड्याळात पहाटेचे साडेपाच वाजलेले... 

"कोरोना रुग्णांना का एवढा त्रास देतात हो,' असा अगतिक प्रश्‍न त्या रुग्णाच्या नातेवाइकांनी "सकाळ'शी संवाद साधताना विचारला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाह्यरुग्ण विभागातही (ओपीडी) कोरोना रुग्णांना मिळणारी वागणूक अत्यंत वाईट असते, असा अनुभव दत्तात्रेय काशीद यांनी सांगितला. "कोणी डॉक्‍टर जवळ येत नाही. तपासत नाही. विचारत नाही. ही फक्त सरकारी रुग्णालयांची अवस्था नाही. ससून रुग्णालयात अशीच बोळवण झाल्याने व्यवस्थित तपासण्यासाठी खासगी रुग्णालयात गेलो. तेथे तर भली मोठी रांग होती. त्यात दोन तास बसलो. त्यानंतर अर्ध्या मिनिटात डॉक्‍टरांनी औषधाची चिठ्ठी समोर टाकून पुढच्या रुग्णाला यायला सांगितले,' असा अनुभवही त्यांनी सांगितला. 

पुणे शहरातील रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांना दाखल करण्यासाठी बेड कमी पडत आहेत. त्यामुळे होम आयसोलेशनचा सल्ला देत आहोत. पण, त्या रुग्णांची गर्दी ओपीडीतही वाढत आहे. 
- डॉ. भारत खेडकर 

loading image