वासुलीत दिव्यांग बांधवांना आर्थिक आधार

वासुलीत दिव्यांग बांधवांना आर्थिक आधार
Published on: 

आंबेठाण, ता.८ : दिव्यांग बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे, या उद्देशाने वासुली (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या वतीने पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीअंतर्गत गावातील सहा पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना एकूण सात लाख ४४ हजार ५९४ रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातून दिव्यांग कल्याणासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या निधीमधून प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्येकी १ लाख २४ हजार ९९ रुपये याप्रमाणे आर्थिक मदत देण्यात आली. या निधीमुळे दिव्यांग बांधवांना आर्थिक आधार मिळणार असून, त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याबरोबरच स्वावलंबी होण्यासाठीही मदत होणार आहे.

दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगता यावे, त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये आणि त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडावा, या सामाजिक बांधिलकीतून ग्रामपंचायतीने हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

या वेळी ग्रामपंचायत सरपंच कोमलताई साईनाथ पाचपुते, उपसरपंच दीपक खंडू लिंभोरे, ग्रामपंचायत सदस्य, प्रशासक तुषार अरविंद साळुंके, ग्रामपंचायत अधिकारी देविदास आजिनाथ आतार, दिव्यांग लाभार्थी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, गावाच्या सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने वासुली ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श उपक्रम राबविल्याची भावना व्यक्त होत आहे.

00042