

भोर, ता. १८ : बहुचर्चित नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेतील ३९ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील ठेवीदारांचे २८ कोटी रुपये देणे अद्यापही बाकी आहेत. दीड वर्षांपासून ३ हजार २३९ ठेवीदार ठेवीचे पैसे परत मिळण्याची वाट बघत आहेत. मात्र, आजपर्यंत त्यांच्या पदरी निराशाच आलेली आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यात लेखापरीक्षक जयसिंग गायकवाड यांनी पतसंस्थेतील २०१० ते २०२४ या कालावधीत ३९ कोटी ८७ लाख ९७ हजार ७१७ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करून ठेवीदारांची फसवणूक केल्याबाबतचा गुन्हा दाखल केला. यामध्ये संस्थेचे संचालक, कर्मचारी आणि कर्जदार मिळून ११२ जणांचा समावेश होता. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने पतसंस्थेचे संचालक भास्कर किंद्रे, सूर्यकांत शिंदे, श्रीधर किंद्रे, सेपान सावले, सुनील म्हस्के व अजित गायकवाड आणि कर्मचारी रामचंद्र मांढरे, रवींद्र कुडले व चंद्रकांत सरपाले यांना अटक केली. त्यापैकी अजित गायकवाड आणि रवींद्र कुडले यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. मात्र इतर सात जण अद्यापही कारागृहातच आहेत. शासनाकडून नेमण्यात आलेल्या प्रशासकांनी कर्जवसुली करून काही ठेवीदारांचे सुमारे १० कोटी रुपये दिले. मात्र इतर ठेवीदारांचे अद्यापही २८ कोटी रुपये देणे बाकी आहे, त्यामुळे ठेवीदारांची दिवाळी मात्र गोड झाली नाही.
नेरे विभाग पतसंस्था सद्यस्थिती
सभासद : ३ हजार ४२५
ठेवीदार : ३ हजार २३९
कर्जदार : ८१७
एकूण ठेवी (फक्त मुद्दल) : २८ कोटी ९८ लाख १७ हजार ६०२
एकूण कर्ज (फक्त मुद्दल): २८ कोटी ४२ लाख ४६ हजार ५०७
नेरे विभाग पतसंस्थेच्या कर्जदारांकडून वसुली सुरू असून कलम ८८ खाली शिवाजी बढे यांच्यामार्फत चौकशी सुरु आहे. ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी कर्जवसुली करण्याची आमची कारवाई सुरू आहे. कर्जदारांच्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे १५ प्रकरणे प्रलंबित आहेत. याशिवाय पतसंस्थेकडे तीन ठिकाणी मालमत्ता आहेत. आमची चौकशी व कर्जवसुली झाल्यानंतर सर्व ठेवीदारांना त्यांचे पैसे खात्यावर जमा करण्यात येतील.
- आदिनाथ पालके, प्रशासक नेरे विभाग पतसंस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.