
Fire Accident : पिसोळीतील प्लास्टिकच्या गोडावूनला आग
उंड्री : पिसोळी (ता. हवेली) येथील धर्मावत पेट्रोल पंपाच्या पाठीमागील अंबिका प्लास्टिकच्या गोडावूनला आग लागली. कोंढवा पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. सोमवारी (दि. 6) पहाटे दोनच्या सुमारास ही आगीची घटना घडली. सचिन रमेश पाठक यांच्या मालकीचे गोडावून असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार आशिष गरुड आणि रोहित पाटील गस्तीवर असताना आगीचे माहिती समजली. त्यांनी तातडीने कात्रज अग्निशमन दलाला माहिती देताच पाच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली.
दरम्यान पोलिसांनी प्लास्टिक गोडावूनमधून पाच सिलेंडरच्या टाक्या आणि कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलविले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीचे कारण समजू शकले नाही. कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.