esakal | बिबवेवाडीत पहिले कोरोना हॉस्पिटल; व्हेंटिलेट, ऑक्सिजनचीही सुविधा

बोलून बातमी शोधा

New Corona Hospital Bibwewadi
बिबवेवाडीत पहिले कोरोना हॉस्पिटल; व्हेंटिलेट, ऑक्सिजनचीही सुविधा
sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : कोरोना रुग्णांना वेळेत चांगले उपचार मिळावेत यासाठी पुणे महापालिका आणि एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन(इएसआयसी) एकत्र येऊन कोरोना रुग्णालय सुरू करत आहे. यामध्ये गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी १० व्हेंटिलेटर तर ९० ऑक्सिजन खाट उपलब्ध होणार आहेत. ऑक्सिजन पुरवठा व इतर तांत्रिक कामांची पूर्तता करून पुढील दोन दिवसात हे १०० खाटांचे रुग्णालय सुरू होणार असल्याने पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. कोरोना रुग्णांची तब्येत गंभीर झाल्याने त्यांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजनचे खाट मिळत नसल्याने नातेवाईक सैरभैर झाले आहेत. रुग्णांचे नातेवाईक खाट मिळविण्यासाठी शहरातील लहान, मोठी सर्व रुग्णालये फिरून पालथी घालत आहेत, नगरसेवक, आमदार, अधिकारी यांना फोन करून, भेटून गयावया करून देखील खाट मिळत नाही. अनेक रुग्ण केवळ वेळेवर खाट मिळाला नाही यामुळे त्यांचा जीव गेला आहे, अशी विदारक अवस्था शहरात आहे. पुणे महापालिकेचे शहरात नायडू, खेडेकर, लायगुडे, दळवी आणि बाणेर येथे कोरोना रुग्णालय सुरू केले आहेत. तेथे सुमारे ५५० ऑक्सिजन खाट उपलब्ध आहेत. जम्बो रुग्णालयात ७०० खाट उपलब्ध करून ते पूर्ण क्षमतेने चालविले जात आहे.

खाटांची संख्या कमी पडत असल्याने महापालिकेने बिबवेवाडीतील ‘इएसआयसी’चे रुग्णालय चालविण्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून तेथे काम सुरू असून, आॅक्सिजनची पाइपलाइन टाकणे, त्यासाठी सिलेंडरची व्यवस्था करणे, व्हेंटिलेटर उपलब्ध करणे अशी महत्त्वाची कामे केली आहे. ‘इएसआयसी’चे डॉक्टर व इतर कर्मचारी आहेतच, पण त्याशिवाय महापालिका २० डॉक्टर उपलब्ध करून देणार आहे. येथील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी सुमारे २० ड्यूरा सिलेंडर लावले जाणार आहेत.

दक्षिण पुण्यात पहिले रुग्णालय
पुणे शहरातील बहुतांशी कोरोना रुग्णालये हे मध्यवर्ती किंवा इतर भागात आहे. पण दक्षिण पुण्यात एकही रुग्णालय नव्हते. बिबवेवाडी येथे १०० खाटांचे रुग्णालय सुरू होत असल्याने त्याचा फायदा बिबवेवाडी, कात्रज, कोंढवा, धनकवडी,पर्वती मार्केटयार्ड यासह इतर भागातील नागरिकांसाठी होऊ शकणार आहे.

खासगी डॉक्टर करणार मदत
‘इएसआयसी’मध्ये रुग्णांना उपचार करण्यासाठी बिबवेवाडी परिसरातील खासगी डॉक्टर स्वतःहून तयार झालेले आहेत. त्यामुळे रुग्णांना आणखी चांगले उपचार मिळणार आहेत. सध्याची स्थिती एकमेकांची मदत करूनच पुढे जाणे योग्य आहे त्यामुळे ही मदत महत्त्वाची ठरणार आहे, अगरवाल यांनी सांगितले.

‘‘इएसआयसी’ रुग्णालयात ऑक्सिजन खाट सुरू केले आहेत, तेथे पाइपलाइन आहे, पण टॅंकरची व्यवस्था नाही त्यामुळे तेथे २० ड्यूरा सिलेंडर पाठवून आॅक्सिजन उपलब्ध केले जात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर रुग्णालय एक दोन दिवसात पूर्ण क्षमतेने सुरू होईल. इएसआयसी, महापालिकेचे डॉक्टर उपचार करणार आहेत.’’
- रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका