पुणे जिल्ह्यात पहिला बर्ड फ्ल्यूचा विषाणू सापडला; नांदे येथे 300 हून अधिक कोंबड्या करणार नष्ट

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

नांदे येथील घरगुती पोल्ट्रीतील संसर्ग झालेल्या सुमारे तीनशेहून अधिक कोंबड्यांची विल्हेवाट लावणार
- एक किलोमीटर अंतरावरील सर्व कोंबड्या नष्ट केल्या जात असून परिसरातील दहा किलोंमीटर परिघातील कोंबड्यांची खरेदी ,विक्री तसेच वाहतूकही तातडीने बंद केली जात आहे. 

पिरंगुट(पुणे) : मुळशी तालुक्यातील नांदे येथे जिल्ह्यातील पहिला बर्ड फ्ल्यू चा विषाणू सापडला असून  परिसरात खळबळ उडाली आहे. दुपारपर्यंत तेथील पोल्ट्रीतील सुमारे तीनशेहून अधिक कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याचे काम युदिधपातळीवर सुरू केले जात आहे , अशी माहिती जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॅा. शिवाजी विधाते यांनी दिली.
 

याबाबत माहिती अशी की, सूस - नांदे रस्त्यावर एका खासगी कुटुंबाने राहत्या घरालगत घरगुती स्वरुपात कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू केलेला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पोल्ट्रीतील चार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या होत्या. त्यानंतर रोज चार ते पाच कोंबड्यांचा मृत्यू होऊ लागला. त्यामुळे चार दिवसांपूर्वी तेथील पोल्ट्री मालकाने मृत कोंबड्यांची तपासणी पुणे येथील औंधच्या प्रयोगशाळेत करून घेतली. त्यावेळी त्यात बर्ड फ्लू विषाणू नसल्याचा अहवाल आला होता. मात्र तरीही कोंबड्यांचे मरण्याचे प्रमाण वाढतच गेल्याने आणखी नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग संस्थेकडे पाठविला. त्याचा अहवाल नुकताच काल शुक्रवारी (ता. १५) रात्री उशिरा आला आणि त्यात या कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्ल्यू''च्या विषाणूने झाल्याचे  निष्पन्न झाले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नांदे येथील संसर्ग झालेल्या सर्व कोंबड्यांची तातडीने विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

नांदे ग्रामपंचायतीने तातडीने जेसीबी व अन्य आवश्यक सामग्री उपलब्ध करून देऊन मदत केली. माजी सरपंच प्रशांत रानवडे यांनी सांगितले की , " नांदे परिसरातील सर्व नागरिकांना व ग्रामस्थांना सूचना देण्याचे काम सुरू असून जेसीबीच्या साह्याने तातडीने खड्डा घेऊन बर्ड फ्लू चा संसर्ग झालेल्या कोंबड्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे. "   

याबाबत जिल्हा जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॅा. शिवाजी विधाते म्हणाले , " नांदे येथील शिंदेमळा येथील एका शेतकऱ्याच्या घरगुती कोंबड्यांना बर्ड र्फ्ल्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून तेथील संसर्ग झालेल्या भागाच्या एक किलोमीटर अंतरावरील सर्व कोंबड्या नष्ट केल्या जात आहेत. तसेच परिसरातील दहा किलोंमीटर परिघातील कोंबड्यांची खरेदी , विक्री तसेच वाहतूकही तातडीने बंद केली जात आहे. "

 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first bird flu virus was found in Pune district More than 300 hens will be destroyed at Mulshi Nande