अकरावी अॅडमिशन : पहिली गुणवत्ता यादी सायंकाळी सहा वाजता जाहीर होणार; चेक करा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 August 2020

- विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयाचे नाव दिसणार लॉगिनमध्ये 
- पहिल्या फेरीचा कट-ऑफ होणार जाहीर

पुणे : बहुप्रतीक्षेत असलेल्या अकरावी प्रवेशाच्या नियमित पहिल्या फेरीतील प्रवेशाची गुणवत्ता यादी रविवारी (ता.३०) दुपारी तीन वाजता प्रसिद्ध होणार अशी माहिती सुरुवातीला प्रशासनाकडून देण्यात आली होती. मात्र आता या वेळेत बदल झाला असून सायंकाळी सहा वाजता यादी जाहीर करण्यात येईल असं संकेतस्थळावर सांगण्यात आलं आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये प्रवेशासाठी मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव दिसणार आहे. तसेच नियमित प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील महाविद्यालयांचा कट-ऑफ देखील कळू शकणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील ३०४ कनिष्ठ महाविद्यालयांमधील एक लाख सहा हजार ७७५ जागांसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यातील जवळपास सहा हजार २२७ विद्यार्थ्यांचे प्रवेश कोट्याअंतर्गत निश्चित झाले आहेत. आता अकरावी प्रवेशासाठी एक लाख ५४८ जागा उपलब्ध असून त्यासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

हे वाचा - यूजीसीसह इतर संस्थांचे अस्तित्व संपणार; भाजप नेत्याचे प्रतिपादन

या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत ९८ हजार ९४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील ८१ हजार ६८७ विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक झाले आहेत. तर ८१ हजार २५१ विद्यार्थ्यांचे अर्ज व्हेरिफाय करण्यात आले आहेत. सुमारे ७३ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी दिलेले पर्याय निवडले आहे. या प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी रविवारी जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांचे लक्ष या यादीकडे लागले आहे.

अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकातील महत्त्वाचे मुद्दे :

कालावधी : कार्यवाहीचा तपशील
३० ऑगस्ट २०२० (सायंकाळी सहा वाजता) : नियमित प्रवेश फेरी
- प्रवेशासाठी गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे.
- विद्यार्थी लॉगिनमध्ये त्याला प्रवेशासाठी मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालय दर्शविणे.
- संबंधित उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालय यास प्रवेशासाठी मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी कॉलेज लॉगिनमध्ये दर्शविणे.
- विद्यार्थ्यांना याबाबत मोबाईल संदेश पाठविणे.
- पहिल्या नियमित प्रवेश फेरीचे कट-ऑफ संकेतस्थळावर दर्शविणे.

अकरावी प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी संकेतस्थळ :
https://pune.11thadmission.org.in

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first merit list for FYJC admission will be announced on Sunday