esakal | लॉकडाउननंतर पुण्यातून आज पहिली एसटी बस धावणार 
sakal

बोलून बातमी शोधा

st-bus

राज्य सरकारने परवानगी दिल्यामुळे पुण्यातील एसटी प्रशासनाने वाहतूक सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या पुणे विभागाचे वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्‍वर रणवरे यांनी दिली.

लॉकडाउननंतर पुण्यातून आज पहिली एसटी बस धावणार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली असलेली एसटीची वाहतूक गुरुवारी (ता.20) सकाळी सात वाजल्यापासून पुन्हा सुरू होणार आहे. पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन या स्थानकांवरून प्रवाशांच्या संख्येनुसार वाहतूक टप्प्याटप्याने सुरू होणार आहे. यापूर्वी शहरातून 3 हजार बसची रोज वाहतूक होत असे. त्यातून 70 हजार प्रवासी ये-जा करीत आहेत. एका बसमधून आता कमाल 22 प्रवाशांची वाहतूक होणार आहे. दरम्यान, या बाबत प्रवासी कल्याणी तोटे म्हणाल्या, ""दीर्घ काळापासून ज्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत होते, तो निर्णय अखेर झाला. आता परजिल्ह्यातील माझ्या नातेवाईकांकडे मी पुरेशी काळजी घेऊन जाऊ शकते, याचा आनंद होत आहे.'' 

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाची वाहतूक 18 मार्चपासून टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली होती. जिल्हाबंदी असल्यामुळे एसटीची आंतरजिल्हा वाहतूक बंद होती. जिल्ह्यातंर्गत एसटी वाहतूक गेल्या पंधरा दिवसांपासून टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने आंतरजिल्हा एसटी बसच्या वाहतुकीला बुधवारी परवानगी दिली आहे. सोमेश्‍वरनगरचे सुरेश पवार म्हणाले, ""गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर एसटीची बससेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता आम्हाला पुण्याबरोबरच साताऱ्याकडेही जाता येईल.'' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्य सरकारने परवानगी दिल्यामुळे पुण्यातील एसटी प्रशासनाने वाहतूक सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या पुणे विभागाचे वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्‍वर रणवरे यांनी दिली. प्रत्येक बस प्रत्येक फेरीनंतर स्वच्छ केली जाईल. त्यानंतर निर्जतुंकीकरण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. प्रवासी ऍड. लाला आटोळे म्हणाले, ""परजिल्ह्यात प्रत्येक वेळी स्वतःची गाडी घेऊन जाण्यापेक्षा आता एसटीची बस सुरू झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मला इतर जिल्ह्यातील माझ्या खटल्यांचे कामकाज पाहता येईल.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या मार्गांवर दर एक तासांनी बस 
कोल्हापूर, ठाणे, दादर, बोरिवली, नाशिक, औरंगाबाद आदी मार्गांवर गुरुवारपासून दर एक तासांनी बस उपलब्ध असेल. तर, सोलापूर, पंढरपूर, शिर्डी आदी मार्गांवरही प्रवासी संख्येनुसार बस सोडण्यात येणार आहेत. एसटीच्या बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना कोणत्याही प्रकारे ई - पास लागणार नाही, असेही एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 
 

loading image
go to top