रिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

पिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होईल. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे कामही जानेवारीत सुरू होईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाळुंगे-माण हायटेक सिटी प्रकल्पाच्या कोनशिला समारंभात शुक्रवारी (ता. १६) दिली. 

पिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होईल. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे कामही जानेवारीत सुरू होईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाळुंगे-माण हायटेक सिटी प्रकल्पाच्या कोनशिला समारंभात शुक्रवारी (ता. १६) दिली. 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली बालेवाडी-म्हाळुंगे क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, खासदार अनिल शिरोळे, आमदार संग्राम थोपटे, मेधा कुलकर्णी, बाबूराव पाचर्णे, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी संचालक किरण गित्ते उपस्थित होते. त्या वेळी फडणवीस बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन म्हणून मुंबई खालोखाल पुणे काम करीत आहे. औद्योगिक हब, आयटी हब येथे आहे. नागरीकरणाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आम्ही पीएमआरडीएची स्थापना केली आहे. त्यामार्फत सिंगापूर सरकारच्या कंपनीच्या साह्याने विकास आराखडा करण्यात येत आहे. मार्च २०१९ मध्ये प्रारूप विकास आराखड्याची नोटीस काढू. तर, सप्टेंबर २०१९ मध्ये विकास आराखडा मंजूर करू. पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापनाबरोबरच नागरी विकासासाठी दळणवळण महत्त्वाचे आहे. मेट्रोचे काम सुरू होत आहे. रिंगरोड हा शहराच्या प्रगतीसाठी पुढील वीस वर्षे इंधन ठरणार आहे. जिल्ह्यातून जाणारे सर्व राष्ट्रीय महामार्ग रिंगरोडला मिळणार असल्याने तो पश्‍चिम व दक्षिण महाराष्ट्राचा ‘गेट वे’ ठरेल. त्याच्या भूसंपादनासाठी दहा हजार कोटी रुपये, तर बांधकामासाठीही तेवढाच खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे जमिनीची जबाबदारी आम्ही घेतो, रस्त्याची जबाबदारी केंद्राने घ्यावी, असे मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सांगितले आहे. त्यांनी ते मान्यही केले असल्याने जागतिक दर्जाचा रिंगरोड बांधण्यात येईल.’’

पुरंदर विमानतळासाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘त्यासाठी भूसंपादन मॉडेल तयार केले आहे. तेथील गुंतवणुकीसाठी तीन-चार सरकारी कंपन्यांचे एकत्रीकरण करणार आहोत. त्यालगत नियोजनबद्ध विकास होण्यासाठी एअरपोर्ट सिटी करावी लागेल. लोहगाव विमानतळाचाही विस्तार करीत आहोत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पीएमआरडीएला सोळा हजार घरे वाटपासाठी मिळणार आहेत.’’

फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘सरकार हिंजवडी आयटी पार्कजवळ हायटेक सिटी करीत आहे. त्याद्वारे पुण्याचे नाव जगभरात पोचेल. सरपंच, गावकरी येथे भागीदार आहेत. हे मॉडेल सर्वांना समृद्ध करणारे आहे. अशा प्रकारे काही नगररचना योजना या भागात राबविण्यात येतील.’’

बापट, शिवतारे यांचीही या वेळी भाषणे झाली. गित्ते यांनी प्रास्ताविकामध्ये योजनेची माहिती दिली. कविता द्विवेदी यांनी आभार मानले.

हायटेक सिटी प्रकल्प
प्रकल्पाचे क्षेत्र   - २५० हेक्‍टर
बांधकाम क्षेत्र   - ६० लाख चौरस मीटर
परवडणाऱ्या घरांसाठी क्षेत्र   - १३.३ हेक्‍टर
नागरी सुविधांसाठी राखीव क्षेत्र - २३ हेक्‍टर 
नदीकाठी हरितपट्टा - १२.५ हेक्‍टर
पायाभूत सुविधेसाठी खर्च  - ६२० कोटी रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first stage of the ring road is from first December