कौशल्य विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ. पालकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

First Vice-Chancellor of Maharashtra State Skills University Dr Apurva Palkar pune

कौशल्य विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ. पालकर

पुणे : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी डॉ. अपुर्वा पालकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्रालयाने बुधवारी या संबंधीची अधिसूचना निर्गमित केली आहे. डॉ. पालकर सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजेस या केंद्राच्या संचालक म्हणून कार्यरत आहे. अहमदाबाद येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (आयआयएम) मधून व्यवसाय प्रशासन या विषयात डॉ. पालकर पदवीधर आहेत. मागील दोन दशकाहून अधिक काळ व्यवसाय प्रशासन विषय त्या शिकवत असून, या क्षेत्रात त्या संशोधनही करत आहे. व्यवस्थापन विज्ञान अभ्यासक्रमांसाठी अखिल भारतीय प्रवेश परीक्षा आयोजित करणाऱ्या समितीच्या प्रमुख म्हणूनही त्या सक्रिय होत्या. 

राज्य सरकारने स्थापन केलेल्या शिक्षण समित्यांमध्येही डॉ. पालकर यांचा सहभाग आहे. सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही डॉ. पालकर यांनी काम पाहिले होते. या दरम्यानच त्यांना प्रतिष्ठित रवी जे मथाई नॅशनल फेलोशिप अवार्ड प्राप्त झाला होता. पुढील दोन वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे. २०१७ मध्ये तत्कालीन केंद्रीय कौशल्य आणि उद्योजकता विकास राज्यमंत्री राजवी प्रताप रूढी यांनी देशातील पहिले कौशल्य विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन करण्याची घोषणा केली होती. तेंव्हापासून प्रलंबित असलेला कौशल्य विद्यापीठ कायद्याची अमलबजावणी १४ एप्रिल २०२१ रोजी करण्यात आली. अखेरीस या विद्यापीठाला डॉ. पालकर यांच्या रूपाने पहिल्या कुलगुरू मिळाल्या आहे.

राज्यातील तरुणाईला एकात्मिक, समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणे आणि त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करण्याच्या हेतूने राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (सार्वजनिक-अर्थसहाय्यित) स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्रात असलेले उद्योग समूहांचे मोठे जाळे व रोजगाराच्या प्रचंड संधी विचारात घेता राज्यात सार्वजनिक कौशल्य विद्यापीठाची स्थापना करणे आवश्यक होते. उद्योगांच्या मागणीनुसार तांत्रिक क्षमता आणि विविध कौशल्यप्राप्त मनुष्यबळ निर्माण व्हावे असा कौशल्य विद्यापीठ स्थापनेचा उद्देश आहे.

Web Title: First Vice Chancellor Of Maharashtra State Skills University Dr Apurva Palkar Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..