जोडोनिया कर - पान १५

जोडोनिया कर - पान १५
Published on

जोडोनिया कर - पान १५

पंचही भूतांचा एकचि विटाळ
(पूर्वार्ध)

पंचही भूतांचा एकचि विटाळ ।
अवघाचि मेळ जगीं नांदे ॥१॥
तेथें तो सोंवळा वोंवळा तो कोण ।
विटाळाचें कारण देह मूळ ॥२॥
आदिअंतीं अवघा विटाळ संचला ।
सोंवळा तो झाला कोण न कळे ॥३॥
चोखा म्हणे मज नवल वाटतें ।
विटाळ परतें आहे कोण ॥४॥
- संत चोखामेळा

पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या पाच तत्त्वांपासून प्रत्येक देह बनलेला आहे. मग तो कोणत्याही जातीचा, वर्णाचा, श्रीमंताचा किंवा गरिबाचा असो. देहाची मूलभूत रचना एकच आहे.
चोखामेळा अत्यंत साधा पण मूलभूत प्रश्न विचारतात.
जर सर्वांच्या शरीरात तीच पंचमहाभूते आहेत, तर एका शरीराला ‘शुद्ध’ आणि दुसऱ्याला ‘अशुद्ध’ म्हणण्याचे कारण काय? जगातील सर्व जीवसृष्टी ही पंचमहाभूतांच्या परस्पर संयोगाने निर्माण झाली आहे. माणूस, प्राणी, वनस्पती या सर्वांत हीच तत्त्वे आहेत. म्हणून बाह्य शरीराच्या आधारावर श्रेष्ठ-कनिष्ठ, सोवळे-ओवळे, शुद्ध-अशुद्ध असे भेद करणे तर्काला धरून नाही.
‘अवघाचि मेळ जगीं नांदे’ म्हणजे संपूर्ण जग हे या पंचमहाभूतांच्या एकत्रित मेळातून अस्तित्वात आहे. त्यामुळे सृष्टीच्या मुळाशीच एकत्व आहे; भेद मानवी मनाने निर्माण केले आहेत.
इथे संत चोखा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करतात, जेथे सर्व देहांची निर्मिती एकाच पंचमहाभूतांपासून झाली आहे, तेथे सोवळा कोण आणि ओवळा कोण? ‘सोवळे’ म्हणजे शुद्ध आणि ‘ओवळे’ म्हणजे अशुद्ध, असा बाह्य व्यवहारातील अर्थ येथे आहे.
पण चोखामेळा सांगतात, की विटाळाचे मूळ कारणच देह आहे. देह हा जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत बदलणारा आहे. त्याला भूक लागते, तहान लागते, घाम येतो, मल-मूत्र निर्माण होते, तो आजारी पडतो आणि शेवटी पंचमहाभूतांत विलीन होतो. मग एका देहाला जन्मतःच पवित्र आणि दुसऱ्याला अपवित्र म्हणण्याचा आधार कोणता? येथे संत चोखामेळा यांचा रोख व्यक्तीवर नसून देहाधिष्ठित भेदभावाच्या विचारावर आहे. देह हा भेद निर्माण करतो; आत्मा भेद निर्माण करत नाही.
देहाला जात, वर्ण, रूप, वय, लिंग इत्यादी ओळखी आहेत; परंतु आत्मतत्त्व सर्वांमध्ये समान आहे.

drsunildeshpande@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com