Plaster Collapse : छताचे प्लास्टर कोसळून पाच महिला जखमी

ताडीवाला रस्ता येथील दयाराम तुळशीराम राजगुरू सांस्कृतिक भवनात लग्न समारंभ सुरू असताना अचानक छताचा काही भाग कोसळल्याने पाच महिला जखमी झाल्या.
ceiling plaster collapse
ceiling plaster collapsesakal

पुणे/मुंढवा - ताडीवाला रस्ता येथील दयाराम तुळशीराम राजगुरू सांस्कृतिक भवनात लग्न समारंभ सुरू असताना अचानक छताचा काही भाग कोसळल्याने पाच महिला जखमी झाल्या. त्यामुळे महापालिकेच्या समाजमंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, हे समाजमंदिर राजकीय पदाधिकाऱ्याच्या ताब्यात असून, त्याचा करार कधी झाला, कोणासोबत झाला याची कोणतीही माहिती महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे.

ताडीवाला रस्ता भागात राहणारे शंकर पाटणेकर यांच्या मुलीचा विवाह सोहळा या भवनात आज (ता. ७) आयोजित केला होता. कार्यक्रम सुरू असतानाच अचानक हॉलच्या छताचा काही भाग तेथे कोसळल्या. तेथे खुर्च्यांमध्ये बसलेली वऱ्हाडी मंडळी यात जखमी झाली. हॉलमध्ये सिमेंटच्या तुकड्यांचा खच पडला.

जखमी झालेल्या पाहुण्यांना दवाखान्यात नेण्याची एकच गडबड सुरू झाली. खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर सरूबाई संपत साळवे व संगीता अनिल साळवे या दोघींना सिटी स्कॅन करण्यास सांगितले, असे या वेळी तेथे उपस्थित असलेले राजू कांबळे यांनी सांगितले.

हा प्रकार घडल्यानंतर महापालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाकडून मालमत्ता व्यवस्थापन विभाग, समाज विकास विभागाला याची माहिती देण्यात आली नाही. तसेच हा हॉल समाजकल्याण विकास विभागाच्या ताब्यात आल्याचे सांगण्यात आले. पण समाजकल्याण विभागानेही हा हॉल आमच्या ताब्यात नसल्याचे सांगितले.

त्यामुळे लाखो रुपये खर्च करून बांधलेले सांस्कृतिक भवन, समाज मंदिराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त इंद्रायणी कचरे म्हणाल्या, ‘हे सांस्कृतिक भवन एक हजार चौरस फुटांपेक्षा मोठे असल्याने त्याचा ताबा समाजकल्याण विभागाकडे आहे. त्याची देखभाल दुरुस्ती याच विभागाकडून पाहिली जाते.’

समाजकल्याण विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास म्हणाले, ‘‘ताडीवाला रस्ता येथील चार समाज मंदिरे आमच्या ताब्यात आहेत. पण त्यात राजगुरू सांस्कृतिक भवनाचा समावेश नाही. या ठिकाणी कर्मचारी पाठवून पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाईल.’

स्थानिक लोकप्रतिनिधीचा ताबा

या भवनाची इमारत बांधून अनेक वर्षे झाली आहेत. पण त्याचा ताबा महापालिकेकडे नसून स्थानिक लोकप्रतिनिधीकडे आहे. त्याची देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे छताचे सिमेंटचे प्लॅस्टर पडून लग्न समारंभासाठी आलेल्या महिला जखमी झाल्या. पुन्हा एकदा समाज मंदिरे, सांस्कृतिक भवन माजी नगरसेवकांच्या ताब्यात ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे.

जबाबदारी कोणाची?

इमारत महापालिकेची असली तरी ताबा महापालिकेचा नाही. नागरिकांकडून खासगीरीत्या कार्यक्रमासाठी हजारो रुपये घेतले जातात. अशा वेळी जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com