बारामतीत राष्ट्रवादीच्या पदाधिका-याची फ्लेक्सबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Baramati Flex

Baramati NCP Flex : बारामतीत राष्ट्रवादीच्या पदाधिका-याची फ्लेक्सबाजी

बारामती - एकीकडे फ्लेक्सबाजी करुन शहर विद्रुप करु नका या साठी सातत्याने पाठपुरावा करणारे विरोधी पक्षनेते अजित पवार व दुसरीकडे त्यांच्या या भूमिकेकडे दुर्लक्ष करत शहरात फ्लेक्सबाजी करणारे त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी असे चित्र बारामतीत पाहायला मिळाले.

शहरातील एका पदाधिका-याची संघटनेत नियुक्ती झाल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी संबंधित पदाधिका-याच्या अभिनंदनाचे फ्लेक्स शहरभर झळकले. वास्तविक फ्लेक्स लावण्यासाठी बारामती नगरपालिकेची परवानगी गरजेची असते, त्या साठी काही शुल्क अदा करावे लागते. नियमांची पायमल्ली करत हे फ्लेक्स शहरभर झळकले, त्यावर नेत्यांसह काही कार्यकर्त्यांचीही छायाचित्रे आहेत.

अजित पवार यांची भूमिका राष्ट्रवादीच्या सर्वच पदाधिका-यांना जवळून माहिती असताना ही फ्लेक्सबाजी थांबविण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही की नगरपालिकेने या फ्लेक्सवर काही कारवाई केली.

शहर विद्रुपीकरणाच्या विरोधात सातत्याने अजित पवार यांनी भूमिका घेतली असताना त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते मात्र फ्लेक्सबाजी करताना मागचा पुढचा विचारच करत नाही, या बाबत नागरिकांनीही आश्चर्य व्यक्त केले. शहरातील मोक्याच्या ठिकाणी हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता हे फ्लेक्स लावले गेले, विशेष म्हणजे नगरपालिका प्रशासनानेही त्याकडे कानाडोळा केला.