esakal | जुनी सांगवीत पुराच्या पाण्याचा बसला गॅस शवदाहिनीला फटका
sakal

बोलून बातमी शोधा

Old-sangvi

- जुनी सांगवीतील पवनानदीकाठावर असलेल्या स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीतील उपकरणांना पवनेच्या पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे.

- गेल्या वीस दिवसांपासून येथील गँस शवदाहीनी बंद आहे.

जुनी सांगवीत पुराच्या पाण्याचा बसला गॅस शवदाहिनीला फटका

sakal_logo
By
रमेश मोरे

जुनी सांगवी : जुनी सांगवीतील पवनानदीकाठावर असलेल्या स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीतील उपकरणांना पवनेच्या पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. गेल्या वीस दिवसांपासून येथील गँस शवदाहीनी बंद आहे. यामुळे अंत्यसंस्कारासाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सर्व सामान्य नागरिकांना अंत्यसंस्काराचा अर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तर पावसाळी दिवस असल्याने अत्यंविधीसाठी ईतरत्र जावे लागत आहे. 

या शवदाहिनीवर जुनी सांगवी, नवी सांगवी, दापोडी आणि पिंपळे गुरव परिसरातून लोक अंत्यसंस्कारासाठी येतात. नदीकाठच्या भागात पुराचे पाणी शिरल्याने ही शवदाहिनी बंद होती. दुरूस्तीची कामे सुरू असून येत्या दोन तीन दिवसात सुरू होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. येथील जनरेटर, पँनेल, मोटार आदी उपकरणे खराब होवून जवळपास पाच लाखाचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. मात्र संभाव्य धोका माहीती होता तर उपकरणांची खबरदारी का घेण्यात आली नाही. असा प्रश्न नागरीकांमधून विचारला जात आहे. 

असाच पुराचा धोका पुन्हा संभवल्यास यावर ठोस उपाययोजना काय असा प्रश्नही शिल्लक राहातो. त्यामुळे या शवदाहिनीमधील काही यांत्रिक उपकरणांना मोठा फटका बसला आहे. उपकरणे काम करीत नसल्याने शवदाहिनी बंद ठेवावी लागली. पुर परिस्थितीत संभाव्य पाण्याचा धोका माहीत असताना देखील याबाबत प्रशासनाकडून आधीच योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक होते. मात्र पुराच्या पाण्याचा संभाव्य धोका माहीती असूनही त्याबाबत कुठलीच उपाययोजना करण्यात आली नसल्यानेच येथील उपकरणांना मोठा फटका बसून नागरीकांना याची झळ सोसावी लागत आहे. सध्या सरपण आदी गोष्टी खर्चीक असल्याने नागरीक शवदाहीनीचा पर्याय निवडतात. सद्यस्थितीत नागरिकांची मोठी गैरसोय होत असून नागरिकांना अंत्यविधी पारंपारिक पद्धतीने लाकडावर करावा लागत आहे.

प्रदुषण कमी होवून पर्यावरण अबाधित राखण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील ही पहिली पर्यावरणपुरक गँस शवदाहीनी आहे. पुराच्या पाण्याचा संभाव्य धोका माहीत असूनही यावर देखभाल दुरूस्ती करणारे अधिकारी कर्मचारी आम्ही अजुनही नविन आहोत असा कांगावा करत आहेत. ठेकेदारी पद्धतीने चालविण्यात येणा-या या शवदाहीनाच्या दुरूस्ती खर्चाची झळ ठेकेदार सोसणार का? तर नुकसान विम्यातून खर्च साधण्यात यावा असे ठेकेदाराला सांगण्यात आल्याचे अधिका-यांकडून समजते.

लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष करत गेली पंधरा दिवस यावर चुप्पी साधली होती. दुरूस्तीचे काम सुरू असून येत्या दोन दिवसात पुन्हा पुर्ववत शवदाहिनी सुरू होईल. मात्र भविष्यात पुराच्या पाण्याची योग्य ती खबरदारी घेण्यासाठी उपाययोजना करावी असे सांगवीकरांमधून बोलले जाते. याबाबत मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते.

"भविष्यात पुराच्या पाण्यापासून धोका होवू नये यासाठी जनरेटर, बेसमेंटची उंची वाढवणे आदी गोष्टी विचाराधीन आहेत. यातून मार्ग काढला जाईल."
- शहर अभियंता प्रवीण तुपे, 

"याबाबत तज्ञांकडून माहीती घेवून सूचना केल्या जातील. सद्यस्थितीत दुरूस्तीचे काम संपून दोन दिवसात दाहीनी सुरू होईल."
- हर्षल ढोरे-नगरसेवक

"महापालिकेतर्फे शवदाहिनी बंद पडणे नविन नाही. कधी केबल खराब होणे, तर कधी दुर्लक्षामुळे येथील कारभार विस्कळीत झालेला होतो. संबंधितांनी नागरीकांचा त्रास ओळखून लक्ष दिले पाहीजे."
-  राजू सावळे, पर्यावरणप्रेमी

loading image
go to top