पर्वतीमध्ये 11 लाख रुपयांची रोकड जप्त; तीन दिवसांत दुसरी कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

पर्वती विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक आयोगाने नेमलेल्या स्थिर पथकाने सहकारनगर येथील अरण्येश्वर येथे वाहन तपासणीदरम्यान  11 लाख 1 हजार 260 रुपयांची रोकड पकडली.

पुणे : पर्वती विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक आयोगाने नेमलेल्या स्थिर पथकाने सहकारनगर येथील अरण्येश्वर येथे वाहन तपासणीदरम्यान  11 लाख 1 हजार 260 रुपयांची रोकड पकडली. ही रोकड एका काळ्या रंगाचा मोटारीत मिळून आली असून मेडिकल वेस्टचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याची ही रोकड आहे. ही गाडी ट्रेझर पार्क सोसायटीकडून मित्र मंडळ चौकाकडे जात होती.

पथक प्रमुख संतोष भाईक, योगेश खरात, सागर नांगरे, सागर गवांदे, किरण साबळे, ज्ञानेश्वर पिंगळे, सुप्रिया शेवाळे, अतुल सुंभकर असे सर्वजण संतनगर येथे वाहन तपासणी करीत होते. सकाळी साडे अकराच्या सुमारास काळ्या रंगाची मोटार पथकाने अडविली. मोटारीची तपासणी करीत असताना डिकीमध्ये एका रेक्झिन बॅगेत 500 रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले. कर्मचाऱ्यांनी ही रोकड मोजली असता एकूण 11 लाख 1 हजार 260 रुपये असल्याचे स्पष्ट झाले.

ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. संबंधीत व्यापारी घरून त्याच्या ऑफिसला जात असताना ही रोकड सोबत बाळगून होता. पथकाने पंचनामा केला असून पुढील कार्यवाहीसाठी रक्कम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. यापूर्वी महर्षीनगर येथे 2 लाख 72 हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. बुधवारी ही कारवाई करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flying squad of election commission seizes cash of 11 lakh in parvati