बारामतीत जनावरांना सरकारी चाऱ्याचा आधार

संगीता भापकर
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागात गेल्या दहा वर्षांपासून कमी पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती आहे. यावर्षीही अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती कायम असून, टंचाईग्रस्त गावातील 10 हजार 922 जनावरांना सरकारी चाऱ्याचा आधार मिळाला आहे.

मोरगाव (पुणे) : बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागात गेल्या दहा वर्षांपासून कमी पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती आहे. यावर्षीही अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती कायम असून, टंचाईग्रस्त गावातील 10 हजार 922 जनावरांना सरकारी चाऱ्याचा आधार मिळाला आहे.
 
बारामती तालुक्‍यात पळशी, जळगाव सुपे, सुपे, मुर्टी, आंबी, देऊळगाव रसाळ, ढाकाळे, कऱ्हावागज, सावळ, मोरगाव, उंडवडी क. प., खंडूखैरेवाडी, भिलारवाडी या तेरा गावांमध्ये पशुपालकांच्या मागणीनुसार छावण्या सुरू असल्याची माहिती बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.

या गावांमध्ये सरकारी अनुदानावर पशुधनासाठी चारा छावणी चालविण्याचे काम बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, माळेगाव सहकारी साखर कारखाना, बारामती तालुका खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती, राजे प्रतिष्ठान, नवलाईमाता दूध उत्पादक संघ भिलारवाडी या संस्था चारा छावण्या चालविण्याचे काम करीत आहेत. गेली काही वर्षे दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकरी बागायती भागातून मिळेल त्या वाढीव दराने पशुधन जगविण्यासाठी चारा आणण्याची कसरत करत होते. मात्र, सध्या पशुपालकांना सरकारी छावण्यांचा पशुधन जगविण्यासाठी मोठा शाश्वत आधार मिळाला आहे. तरीही स्वतःची उपजीविका आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

यामध्ये लहान जनावरांची संख्या 1497 तर मोठ्या जनावरांची संख्या 9425 अशी आहे. तेरा ठिकाणी आजही 10 हजार 922 जनावरे निव्वळ सरकारी चाऱ्यावर अवलंबून आहे. सरकारने 31 ऑगस्टपर्यंत चारा छावणी सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागात काही गावांमध्ये पाऊसच न झाल्यामुळे येथे चारा पिके उपलब्ध होण्याची शाश्वती नाही. त्यामुळे त्या गावांमध्ये टंचाईची परिस्थिती मुबलक पाऊस पडेपर्यंत कायम राहणार आहे. गावात व परिसरात पशुधन जगविण्याइतपत चारा उपलब्ध होईपर्यंत संबंधित विभागाने चारा छावण्या सुरू ठेवाव्यात, अशी पशुपालकांची अपेक्षा आहे. आजही बारामतीच्या जिरायती भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून ग्रामस्थांना टॅंकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार असून, त्यामुळे चारा उपलब्ध होईपर्यंत येथे चारा छावण्यांची गरज आहे.

कोरडे तलाव व बंधारे भरून द्यावेत
पिण्याचे पाणी, पशुधनाचा चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने बारामतीच्या जिरायती भागातील कोरडे पाझर तलाव, कऱ्हेवरील बंधारे हे नाझरे जलाशय किंवा पुरंदर उपसा सिंचन योजनेतून भरून द्यावेत तरच येथील टंचाईचा प्रश्न सहजतेने आणि कमी खर्चात सुटण्यास मदत होणार आहे. टॅंकर आणि चारा छावण्या यावर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा कोरडे तलाव व बंधारे भरून द्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fodder camp In Baramati