पशुपालकांना गुड न्यूज, छावण्यांना मुदतवाढ

राजकुमार थोरात
बुधवार, 31 जुलै 2019

राज्यातील चारा छावण्यांना 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात आदेश 30 जुलै रोजी काढण्यात आला आहे.

 

वालचंदनगर ः राज्यातील चारा छावण्यांना 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात आदेश 30 जुलै रोजी काढण्यात आला आहे.

राज्यामध्ये मॉन्सूनचे उशिरा आगमन झाल्यामुळे इंदापूर तालुक्‍यासह पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यामध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे. राज्य सरकारने 31 जुलैपर्यंत चारा छावण्या सुरू ठेवण्याचा यापूर्वी निर्णय घेतला होता. मात्र, चारा पिकांची पेरणी केल्यानंतर किमान दोन ते तीन महिने चारापिके येण्यास वेळ लागणार असल्यामुळे चारा छावण्यांना मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. ही मागणी मान्य करून 31 ऑगस्टपर्यंत चारा छावण्या सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

इंदापूर तालुक्‍यामध्ये सोनाई कृषी प्रक्रिया कारखाना, नीरा भीमा सहकारी साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना व जय भवानीगड प्रतिष्ठानच्या वतीने 11 छावण्या सुरू आहेत. छावणीमध्ये 14 हजारपेक्षा जास्त जनावरे आहेत. या जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. छावणीतील मोठ्या जनावरांना दररोज 18 किलो व लहान जनावरांना 9 किलो चारा व पशुखाद्य मिळत आहे.

इंदापूर तालुक्‍यामध्ये चालू वर्षीही पावसाने पाठ फिरवली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे. छावणीला मुदतवाढ मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा चाऱ्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे, असे जिल्हा परिषदेतील बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fodder camp will continue till 31 August