

चारा टंचाई टाळण्यासाठी
कुटार विक्रीवर निर्बंध
वाशीम जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे सुधारित आदेश
ॲग्रोवन वृत्तसेवा
वाशीम ः दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी वाशीम जिल्हा प्रशासनाने सोयाबीन आणि तूर कुटाराच्या वापरावर आणि विक्रीवर निर्बंध घातले आहेत. कुटाराची विक्री करताना पशुपालक शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यासह बायोमास ब्रिकेट्स व पेलेट्स निर्मिती करणाऱ्या उद्योगांना दररोज प्राप्त होणाऱ्या कुटारापैकी किमान ५० टक्के साठा राखीव ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या बाबत जिल्हादंडाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत.
ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे नाहीत, त्यांनी कुटार विकताना प्रथम परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करून द्यावा. त्यानंतर उर्वरित कुटार उद्योगांना किंवा अन्य व्यवसायांना विकता येईल. पशुधन असलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या जनावरांसाठी वर्षभराच्या चाऱ्याची पुरेशी व्यवस्था केल्यानंतरच उर्वरित कुटाराची विक्री करावी.
चारा विकणाऱ्यांना योजनेचा लाभ नाही
कुटारापासून गट्टू (बायोमास ब्रिकेट्स) तयार करणाऱ्या किंवा अन्य उद्योगांना कुटार विकणाऱ्या शेतकऱ्यांना भविष्यात शासनाच्या चारा वाटप योजनेचा लाभ मिळणार नाही. अशा शेतकऱ्यांना विहित नमुन्यातील प्रमाणपत्र तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडे सादर करावे लागेल.
उद्योगांच्या साठ्यावर प्रशासनाचे लक्ष
बायोमास ब्रिकेट्स व पेलेट्स निर्मिती करणाऱ्या उद्योजकांनी त्यांच्याकडे दररोज येणाऱ्या एकूण कुटारापैकी किमान ५० टक्के साठा शासनाच्या आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवावा. या साठ्याची माहिती दर आठवड्याला संबंधित तहसीलदार आणि तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास अधिकाऱ्यांना द्यावी लागेल. जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण झाल्यास उद्योगांकडील राखीव आणि उपलब्ध कुटार प्रशासनाच्या चारा टंचाई निवारण उपाययोजनांसाठी ताब्यात घेतले जाऊ शकते. कुटाराची अवैध साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.