फोंडशिरस गट.... सुनील राऊत
लोगो : फोंडशिरस जि.प. गट
---
मोहिते-पाटील विरुद्ध सातपुते लढतीकडे तालुक्याचे लक्ष
‘सर्वसाधारण’मुळे राजकीय हालचालींना वेग; मोहिते-पाटील परिवारातील तिघांचे अर्ज
सुनील राऊत : सकाळ वृत्तसेवा
नातेपुते, ता. २३ : माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण नऊ गट आणि पंचायत समितीचे १८ गण असून, सर्वसाधारण प्रवर्गासाठीचा फोंडशिरस जिल्हा परिषद गट सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या गटातून मोहिते-पाटील परिवारातील अर्जुनसिंह मोहिते-पाटील, वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते-पाटील तसेच विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्या पत्नी विमल जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
या तिघांच्या विरोधात भाजपकडून माजी आमदार राम सातपुते यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते हरिदास वाघमोडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय बाळासाहेब शिंदे (रासप), प्रशांत रूपनवर (अपक्ष), सुनील विष्णू वाघमोडे, मधुकर भानुदास वाघमोडे, हनुमंत लक्ष्मण वाघमोडे, हनुमंत तुकाराम वाघमोडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, म्हणजेच मोहिते-पाटील व जानकर गटाकडून अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. ऐनवेळी काही तांत्रिक अडचण उद्भवल्यासच विमल जानकर किंवा वैष्णवीदेवी मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा आहे.
भांबुर्डी गणात चुरस
फोंडशिरस गटातील भांबुर्डी पंचायत समिती गणातून चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवीण हनुमंत वाघमोडे आणि भाजपचे देविदास नारायण वाघमोडे यांच्यात थेट लढत होणार असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी सतीश नामदेव पालवे आणि हनुमंत तुकाराम वाघमोडे हे अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत.
फोंडशिरस गणातही अटीतटीची लढत
फोंडशिरस गण क्रमांक ७८ मधून पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोनाली राजेंद्र पाटील आणि भाजपच्या शैला चंद्रकांत वाघमोडे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. या गणात काजल तेजस गोरे, हेमलता सुनील गोरे आणि शोभा मधुकर वाघमोडे हे तीन अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत.
कारखाना परिसर, अर्जुनसिंहांना लाभदायक
फोंडशिरस गट हा सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात येत असल्याने अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांचा या गटातील प्रत्येक गावाशी दैनंदिन संबंध आहे. याच बाबीचा फायदा होईल, या विश्वासातूनच अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी येथे उमेदवारी दाखल केल्याचे बोलले जात आहे. याशिवाय अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी दहिगाव गटातील गुरसाळे येथून माळशिरस पं.स.साठीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या दुहेरी उमेदवारीमुळे तालुक्याच्या पश्चिम भागात मोठी राजकीय चुरस निर्माण झाली आहे.
भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश
भाजपमध्ये माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील, विजयदादांचे सख्खे चुलत भाऊ हिंदुराव माने-पाटील, माजी आमदार बाबूराव देशमुख यांचे चिरंजीव पांडुरंग देशमुख यांच्यासह माने-देशमुख परिवारातील अनेकांनी प्रवेश केल्यामुळे ही लढत अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळे मोहिते-पाटील गटाने ही निवडणूक अत्यंत निकराने लढवण्याचा निर्धार केला आहे.
जानकर-मोहिते युती, शिवसेनेलाही जवळ केले
तालुक्याच्या पश्चिम भागात धनगर समाजाचे प्राबल्य असल्याने जानकर हे मोहिते-पाटील यांच्या जोडीला ठामपणे उभे आहेत. या दोघांच्या संमतीने तालुक्यातील एकूण २७ उमेदवार निश्चित करण्यात आले. विशेष म्हणजे भाजपसोबत असलेल्या शिवसेनेलाही आपल्याकडे वळवत शिवसेनेतर्फे दोन उमेदवार उभे करण्यात आले आहेत.
---
फोंडशिरस गटातील गावे
- भांबुर्डी गण : भांबुर्डी, सदाशिवनगर, पुरंदावडे, तामसिदवाडी, मारकडवाडी, येळीव.
- फोंडशिरस गण : फोंडशिरस, पिरळे, बांगार्डे, कळंबोली, पळसमंडळ, कदमवाडी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

