

शुक्रवारी पेस्टिंग
२- भुजबळ यांचे पिंपरी येथील शेतातील प्रक्रिया निर्मिती युनिट.
१- त्यामध्ये तयार होतात विविध पॅकिंगमधील उत्पादने.
३- उत्पादने विक्रीसाठी उभारलेले आऊटलेट
सकाळी ८ ते १२ व संध्याकाळी साडेपाच ते रात्री दहा वाजेपर्यंत ते सुरू असते.
४- विवेक व अपर्णा भुजबळ दांपत्य.
६- स्वतःच्या शेतातील कच्च्या मालावरही होते प्रक्रिया
प्रक्रियेतून मूल्यवर्धन,
आऊटलेटद्वारे विक्री व्यवस्था
अन्य शेतकऱ्यांच्या मालासही उपलब्ध केले मार्केट
शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने मूल्यवर्धन अर्थात प्रक्रिया उद्योगाचा मार्ग पिंपरी (लादवड) (जि. पुणे) येथील विवेक व अपर्णा या भुजबळ दांपत्याने निवडला. फळे- भाज्यांवर आधारित निर्जलीकरण केलेली उत्पादने, फ्लेक्स आदी उत्पादनांची केवळ निर्मिती करून हे दांपत्य थांबले नाही. तर अर्थकृषी नावाने आऊटलेट उभारून विक्री व्यवस्था उभारली. महिला बचत गट व शेतकऱ्यांची उत्पादने सोबत घेऊन त्यांनाही आपल्या विक्री व्यवस्थेत सामील करून घेतले. या उद्योगातून भुजबळ दांपत्य स्वावलंबी झाले आहे.
......................................
संदीप नवले
...............................................
पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर तालुक्यातील पिंपरी (लादवड) येथील विवेक व अपर्णा या भुजबळ दांपत्याची सुमारे तीन एकर शेती आहे. पपई, संत्रा, आंबा, शेवगा, पेरू, चिकू, पालक, कोथिंबीर, मेथी आदी पिके ते घेतात. काही दिवसांपूर्वी आपल्या मालाला असलेला अधिकचा दर पुढील पाच- सहा दिवसांतच किलोला १० ते १२ रुपयांनी घसरतो आणि आपल्याला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. अशा प्रसंगांना या दांपत्याला सामोरे जावे लागले. शेतमालाचे मूल्यवर्धन होण्याच्या दृष्टीने प्रक्रिया उत्पादने तयार करणे हा त्यावरील मार्ग त्यांना दिसला. त्यादृष्टीने पाऊले टाकण्यास सुरुवात केली. त्यासाठी प्रशिक्षणाची गरज होती. राजगुरुनगर येथील कांदा- लसूण संशोधन संचालनालय, पुणे, नाशिक आदी ठिकाणच्या अन्नप्रक्रिया क्षेत्राशी संबंधित संस्थांमधून अपर्णा यांनी हे प्रशिक्षण घेतले. पुणे व गुजरातहून यंत्रसामग्री आणली. शेतातील पाच गुंठ्यात युनिट उभारले. श्रेया ट्रेडिंग नावाने उद्योगाची सुरुवात झाली.
अशी तयार होतात उत्पादने
प्रक्रिया निर्मितीची सर्व जबाबदारी अपर्णा तर विवेक मार्केटिंग व विक्री या बाबी सांभाळतात. प्रक्रियेसाठी लागणारा कच्चा माल स्वतःच्या शेतातून तसेच शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येतो. निर्जलीकरण केलेली (डिहायड्रेटेड) पावडर व फ्लेक्स स्वरूपातील उत्पादने तयार केली जातात. या अंतर्गत मेथी, कोथिंबीर, बीटरूट, गाजर, लसूण, आले, मिरची, पुदिना, कढीपत्ता, भोपळा, टोमॅटो, पालक, तुळस, कांदा, मूग, मटकी, बटाटा, डाळिंब, अंजीर, आवळा आणि पेरू आदींवर प्रक्रिया करण्यात येते. त्यासाठी ड्रायर, ग्राइंडर, पॅकिंग मशिन, बॉटलिंग मशिन आदी आधुनिक सुविधा उभारली आहे. सुरुवातीला सुमारे १७ लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले. पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत साडेतीन लाख रुपयांच्या अनुदानाचा लाभ मिळाला. भुजबळ यांचा पूर्वीपासून दुग्धव्यवसाय देखील आहे. त्यातील उत्पन्नाचीही भांडवल म्हणून मोठी मदत झाली. एकूण गुंतवणूक सुमारे सव्वा कोटी रुपयांपर्यंत झाली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक दिनेश सावंत, तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे आदींचे मार्गदर्शन मिळाले.
अर्थकृषी आऊटलेटद्वारे विक्री व्यवस्था
भुजबळ दांपत्याने आपल्या गावापासून सहा किलोमीटरवरील राजगुरुनगर येथे अर्थकृषी नावाने आऊटलेट उभारून उत्पादनांसाठी विक्री व्यवस्था तयार केली आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन ३०, ५० ग्रॅमपासून १००, ५०० ग्रॅम ते एक किलोपर्यंतची पॅकिंग सादर केली आहेत. प्रकारानुसार प्रति किलो ३०० पासून ते पंधराशे रुपयांपर्यंत किमती आहेत. केवळ आपल्याच उद्योगाची नव्हेत तर सावित्रीबाई फुले महिला बचत गटाची व अन्य शेतकऱ्यांची उत्पादनेही आपल्या आऊटलेटमधून उपलब्ध केली आहेत. यात मोहाचे लाडू, वाळवणीचे पदार्थ, मध, भरडधान्यांची पिठे, मोरिंगा पावडर, लोणची, काळा व लाल तांदूळ, गूळ आदींची विविधता आहे. त्याद्नारे बचत गटाच्या महिलांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महिलांना एकत्रित करून सामुहिक विक्री व्यवस्थेला बळ देण्यासाठी अर्थकृषी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. त्यातून उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री या तिन्ही स्तरांवर महिलांचे एकत्रीकरण केले आहे.
सोशल मीडिया आणि प्रदर्शनातून प्रमोशन
केवळ आऊटलेटवर अवलंबून न राहाता यूट्यूब, फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आदींचा प्रभावी वापर केला आहे. उत्पादनांचे महत्त्व, वापरण्याची पद्धत, फायदे, खरेदीची सुविधा, टोल फ्री क्रमांक आदी सुविधा ग्राहकांना दिल्या आहेत. मुंबई येथील बीकेसी परिसर, नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र, भीमथडी, किसान तसेच अन्य कृषी प्रदर्शनांमध्ये स्टॉल उभारून उत्पादनांची विक्री करण्यात येते. प्रदर्शनाचा आकार व कालावधी यानुसार २५ ते ५० हजार ते त्याहून अधिक उत्पन्न त्यातून मिळते. खाजगी कंपन्यांच्या कार्यक्रमांमध्येही स्टॉल उभारण्यात येतात. त्यातून ग्राहकांचे नेटवर्क मजबूत होण्यास मदत होते. भुजबळ यांच्याकडे सुमारे १२ गाई आहेत. रोजचे ७० लिटरच्या दरम्यान दूध संकलन होते. परिसरातील ७० ते ८० ग्राहकांना दुधाचे रतीब पुरवण्यात येते. सर्व प्रयत्नांमधून दरमहा सव्वा लाख रुपयांची उलाढाल होते. अन्य व्यावसायिकांसोबत भागीदारीचेही प्रयत्न सुरू आहेत. विवेक सांगतात की निर्जलीकरण केलेल्या उत्पादनांना चांगली मागणी आहे. काही व्यावसायिकांकडून आम्हाला मोठ्या प्रमाणात म्हणजे टनाच्या रूपात ऑर्डर आली आहे. उत्पादनाची तेवढी क्षमता वाढवण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
अपर्णा भुजबळ : ९०२२४३१२५८, ९०११६१८८१३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.