

हृदयरोगतज्ज्ञ पत्नीची सासरच्यांनी गर्भपात केल्याची फिर्याद
अस्थिरोगतज्ज्ञ पतीला जामीन मंजूर; वकील म्हणाले, कायद्याच्या दुरुपयोगाचे उदाहरण
सोलापूर, ता. २६ : येथील हृदयरोगतज्ज्ञ (कार्डिओलॉजिस्ट) पत्नीचा जबरदस्तीने गर्भपात केल्याच्या आरोपावरून अस्थिरोग शल्यचिकित्सक (ऑर्थोपेडिक सर्जन) पतीविरुद्ध विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. ही फिर्याद म्हणजे महिला कायद्याच्या दुरुपयोगाचे मोठे उदाहरण असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला. यावरून सत्र न्यायालयाने संशयित डॉक्टर पतीस अटकपूर्व जामीन मंजूर केला.
सोलापुरातील हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर महिलेचा विवाह नाशिक येथील अस्थिरोग शल्यचिकित्सकासोबत जून २०२५ मध्ये झाला होता. लग्नानंतर आठ-दहा दिवसांतच पती, सासू-सासरे व दोन नणंदा या सर्वांनी माहेरहून पैसे आण म्हणून शारीरिक व मानसिक छळ चालू केला. ‘माहेरहून पैसे आण, नाहीतर गर्भपात कर’ असे म्हणून इच्छेविरुद्ध बळजबरीने नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये गर्भपात केल्याची फिर्याद महिला डॉक्टरने पोलिसांत दिली होती. त्यावरून पती, सासू-सासरा आणि दोन नणंदांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. अटकेच्या भीतीने सर्जन पतीने ॲड. धनंजय माने यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. अर्जावरील सुनावणीवेळी ‘हा खटला म्हणजे महिला कायद्याचा कसा दुरुपयोग केला जातो याचे जिवंत उदाहरण आहे. सासू-सासरे तालुक्याच्या ठिकाणी राहतात, एक वकील विवाहित नणंद मुंबईत, दुसरी विवाहित नणंद अहिल्यानगरमध्ये राहायला आहे. फिर्यादी नाशिक शहरात राहत होती. तिने स्वेच्छेने गर्भपात केल्याचे वैद्यकीय कागदपत्रांवरून दिसून येते. धक्कादायक बाब म्हणजे गर्भपाताच्या दिवशी त्या दवाखान्यातील दुसऱ्या इमारतीत सासू कर्करोगावर उपचारासाठी ॲडमिट होती. कॅन्सरग्रस्त सासूची शुश्रूषा करण्याऐवजी शेजारच्या बिल्डिंगमध्ये तिने गर्भपात करून घेतला. केवळ सासरच्या लोकांना त्रास देण्यासाठी फिर्याद दिली आहे,’ असा युक्तिवाद ॲड. माने यांनी केला. तो मान्य करून न्यायालयाने संशयितास जामीन मंजूर केला. यात संशयितातर्फे ॲड. जयदीप माने, ॲड. प्रणित जाधव, ॲड. किरण गवळी यांनीही काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.