पुणे : पोलिसांची जबरदस्ती कारवाई; नागरिक संतप्त

forcefully action by Pune traffic police
forcefully action by Pune traffic police

कॅन्टोन्मेंट (पुणे) :आयुक्तसाहेब...सी सीटीव्ही आणि वाहतूक पोलिसांची अंधपणाने सुरू असलेली जुलमी कारवाई वाहनचालकांनी किती दिवस सहन करायची. अनेक वाहनचालकांना चुकीच्या क्रमांकाचा दंड आकारल्याचे मोबाईलवर संदेश पाठविले जात आहेत. त्यातच वाहतूक पोलिसांकडून मार्चएन्डमुळे वसुली सुरू झाली आहे. वाहतूक सुरळीत करणे हे वाहतूक पोलिसांचे आद्यकर्तव्य आहे. मात्र, मूळ प्रश्नाला बगल देत वाहतूक पोलिस थेट महसूल गोळा करण्याचे काम करीत असल्याने पुणेकर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

16 फेब्रुवारी रविवार रोजी मी घराबाहेर पडलोच नाही, माझी गाडी ही सोसायटीच्या पार्किंग मध्येच पार्क होती. आणि अचानक मला माझ्या  मोबाईल वर नो पार्किंगमध्ये चारचाकी उभी असल्याने 200 रु.दंड आकारण्याचा मेसेज आला. यावेळी लिंक वरील इमेज पहिली असता गाडीचा क्रमांक जवळ जवळ सारखाच होता, फक्त  शेवटच्या अंकात फरक आढळून आला. गाडीचा मॉडेल ही दुसरा होता. त्यामुळे हा मेसेज मला आल्याने मी थोडा चकितच झालो होतो. वाहतूक विभागाकडून अशा डोळेझाक पद्धतीच्या कारभारामुळे अनेकांना विनाकारण भुर्दंड भरावा लागत असल्याचे जयशील बारकर राहणार (घोरपडे पेठ) यांनी तक्रार करीत सांगितले.

पुणे शहर आणि उपनगरामध्ये सीसीटीव्ही आणि वाहतूक पोलिसांकडून वाहनांचे फोटो काढून कारवाई करण्याचा धडाका सुरू आहे. अनेक दुचाकी वाहनधारकांना चार चाकीवाहनांच्या क्रमांकाचे दंड आकारल्याचा एसएमएस आला आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आहे. वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याऐवजी मार्च एन्डमुळे वाहनाधारकांना अडवून त्याच्यावरील थकित दंडाची रक्कम वसूल करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. वाहतूक पोलिस महसूल गोळा करण्याचे काम करत असतील, तर त्यांची रवानगीच महसूल विभागात करून वाहतूक सुरळीत कऱण्यासाठी वॉर्डनची नियुक्ती करणेच इष्ट ठरणार आहे, असे सूज्ञ पुणेकरांनी सांगितले.

गोळीबार मैदान चौक, पुलगेट, जुना पुलगेट, रेसकोर्स वाहतूक शाखा, काळुबाई चौक, क्रोममॉल चौक, रामटेकडी. वैदूवाडी, मगरपट्टा चौक, रवीदर्शन, मांजरी फाटा चौक येथे वाहतूक पोलीस सिग्नलवर वाहनांचे फोटो काढून कारवाई करतात, तर रेसकोर्स वाहतूक पोलीस चौकीसमोर तर दोन् चौकातील सिग्नलच्या मध्ये थांबून वाहने अवडून कारवाई करतात. त्यामुळे वाहतूककोंडी होऊन अपघातसदृशस्थिती निर्माण होत आहे. पोलिस अधिकारी म्हणतात, तुम्हाला जे काय करायचे ते करा, आम्हाला आमचे काम करू द्या, सरकारी कामात अडथला आणला म्हणून तुमच्यावर कारवाई करावी लागेल, असे सांगतात.

वाहतूक पोलिस सिग्नलवर थांबले, तर कोणीही नियम मोडणार नाही आणि 90 टक्के वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. मात्र, वाहतूक पोलीस तसे करताना कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे वाहतूक पोलिसांचे नेमके काय काम आहे, असा प्रश्व सामान्य वाहनचालकांना पडला आहे.

भरदुपारी अवजड वाहनांवर कारवाई
अवजड वाहनांवर सकाळी आणि सायंकाळी कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, हडपसर वाहतूक पोलिसांचा अजब कारभार सुरू झाला आहे. भर दुपारी वाळूचे ट्रक आणि इतर वाहने अडवून कारवाई सुरू केल्याने नागरिकांनीच आश्चर्य व्यक्त केले. या कारवाईमुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी झाल्याने नागरिकांना अडथळा निर्मान होत आहे. मगरपट्टा चौकात वाहने उभी केल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. खराडी चंदननगर चौक, थेऊरफाटा, मंतरवाडी चौक या ठिकाणी ही कारवाई होणे अपेक्षित आहे. गुन्हेगाराला अगोदर गुन्हा करू द्यायचा आणि नंतर त्याला पकडण्यासाठी यंत्रणा कामाला लावायची असा प्रयोग हडपसर वाहतूक पोलिसांचा सुरू झाला आहे.

सीसीटीव्हीतून चोर का सापडत नाहीत
झेब्रा क्रॉसिंग किंवा सिग्नलला नियमाचे उल्लंघन केलेल्या वाहनांचा छोटासा क्रमांक दिसू शकतो, तर सोनसाखळीचोर आणि महिलां-मुलींची छेडछोड करणारे का दिसत नाहीत, असा साधा प्रश्न सामान्यांना पडला आहे. वाहतूक पोलिसांची जुलमी कारवाई कधी थांबणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. चलनापेक्षा तडजोडीचे प्रकार वाढीस लागले आहेत, त्याकडे कोणी अधिकारी गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसत आहे.

त्यांना वाहतूक पोलिसांचाच वरदहस्त
मगरपट्टा चौकात वाहतूक पोलीस पथकासमोर रिक्षाचालक मीटरप्रमाणे रिक्षा चालवत नाहीत, जवळचे भाडेनाकारत आहेत. ही बाब उपस्थित पोलीस निरीक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर त्यांनी सांगितले की, तुम्ही तुमचे काम करा आम्हाला आमचे काम करू द्या. यावरून रिक्षाचालक आणि पोलीस यांच्यामध्ये आर्थिक हितसंबंध आहेत की काय, तसेच, रिक्षाचालकही म्हणतात, जावा सांगा पोलिसांना आमचे ते काहीही करू शकत नाहीत, असे म्हणून रिक्षाचालक जवळचे भाडे नाकारून निघून जातात. यातूनच त्यांचे काय संबंध आहेत, हे समजून घ्यायचे का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. - अशोक बालगुडे, एक नागरिक

यासंदर्भात त्यांनी सांगितले की,  कॅमेरातून एखादा नंबर व्यवस्थित दिसत नसेल, अथवा एकाच नंबर प्लेटची वाहने वापराने अशी अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे रजिस्टर नंबर वर मेसेज दिला जातो. तरीदेखील त्वरित अशा प्रकरणाचा तपास करून योग्य दखल घेतली जाणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.- विनोद शिंदे : (खडक वाहतूक विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक )

अवजड वाहनांवर कारवाई होणं तर अपेक्षितच आहे. वाहतूक पोलिसांनी नागरिकांशी सौजन्याने वागलेच पाहिजे, एखाद्या नागरिकाला थांबविले तर त्याबाबत विचारणे हा एक नागरिकाचा हक्क आहे. वाहतुकीचे नियमन करणे हे पोलिसांचे प्रथम काम आहे. त्याठिकाणाची पाहणी करून संबंधित पोलीस निरीक्षकाला सूचना देण्यात येईल. रिक्षाचालकांविषयी नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत आहेत. त्यामुळे आज भाडे नाकारण्यासंदर्भात चार रिक्षाचालकांवर कारवाई करून त्यांचे लायसन्स आरटीओ कडे पाठविले आहे. - नागनाथ वाकुडे, (पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com