परदेशी पाहुणे आले आपल्या दारी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

यंदा मात्र दमदार मॉन्सून बरसल्यामुळे राज्यात परदेशी पाहुण्यांना अन्न मुबलक उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील गवताळ प्रदेशात या पक्षांची संख्या सध्या वाढली आहे.

पुणे - गेल्या दोन वर्षांत राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे फारसे गवत उगवले नव्हते. त्यामुळे पक्षांचे अन्न असलेल्या कीटकांची उत्पत्तीही कमी झाली. परिणामी परदेशी पक्षी गेल्या काळात राज्यात फारसे दिसले नाहीत. यंदा मात्र दमदार मॉन्सून बरसल्यामुळे राज्यात परदेशी पाहुण्यांना अन्न मुबलक उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील गवताळ प्रदेशात या पक्षांची संख्या सध्या वाढली आहे.

हिवाळ्यात सैबेरियातून परदेशी पक्षी दरवर्षी आपल्या राज्यात येतात. हजारो किलोमीटरचा प्रवास करून ते राज्याच्या दक्षिणेतील भागात उतरतात. पाणवठ्यांवर त्यांचे थवे पहायला मिळतात. त्यामुळे तेथे येणारे तुतवर, रेडशांक, ग्रिनशांक, हरियर, गॉडविट, प्लोवर हे परदेशी पक्षी आपल्याकडे प्रसिद्ध झाले आहेत. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

पक्षांबरोबरच गवताळ आणि वनांमध्येही येणाऱ्या परदेशी पक्ष्यांची संख्या मोठी असते. गेल्या दोन वर्षांमध्ये वेगवेगळ्या भागात जेमतेम पाऊस पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे दरवर्षी गवताळ प्रदेशात उतरणारे परदेशी पाहुणे गेल्या दोन वर्षांत मोठ्या संख्येने आलेले दिसले नव्हते. यावर्षी मात्र पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे गवताळ प्रदेशात हेरियर, कस्ट्रल, चॅट, बंटिंग, लार्क, रोडफिंच, रेडस्टार अशा विविध परदेशी पाहुण्यांची हजेरी पक्षीनिरीक्षकांना आकर्षित करत आहेत. हे पक्षी दोन वर्षांनंतर आपल्या भागात दिसत आहेत, असे निरीक्षण पक्षी तज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी नोंदविले.

पाणवठे गजबजले
यंदा राज्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे सध्या परदेशी पक्षांना उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पाणवठे मिळत आहे. आपल्या भागातील पाणवठ्यांवरदेखील सध्या मोठ्या संख्येने परदेशी पक्षी आले असून ते वेगवेगळ्या भागात वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे या पक्षांची संख्या कमी दिसत असल्याचे निरीक्षण नोंदले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: foreign birds