कनार्टकात जाणारे म्हणाले, "परत महाराष्ट्रात आलोच तर...' 

karnatak worker
karnatak worker

उरुळी कांचन (पुणे) : एक ना एक दिवस मूळगावी जाऊ देतील, या आशेने मागील 45 दिवसांहून अधिक काळ लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कामगार निवारा केंद्रात राहणाऱ्या 55 परप्रांतीय कामगारांना महसूल व पोलिस खात्याच्या सहकार्याने आपापल्या राज्यात दोन खासगी बसमधून रविवारी (ता. 10) दुपारी पाठवण्यात आले. त्यातील 41 कामगार कर्नाटक; तर चौदा कामगार राजस्थानला पाठविण्यात आले. 

लोणी काळभोर येथील कामगार निवारा केंद्रात दीडशे कामगार मागील दीड महिन्यापासून मुक्कामी होते. या नागरिकांना महसूल खाते, पोलिस खाते व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने मागील दीड महिन्याच्या कालावधीत जेवण, निवारा व सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला होता. निवारा केंद्रात सोईसुविधा उपलब्ध होत असल्या, तरी अपवाद वगळता सर्व नागरिकांना मूळगावी जाण्याची ओढ लागली होती. सरकारकडून परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची परवानगी मिळताच आमदार अशोक पवार यांनी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पोलिस निरीक्षक सूरज बंडगर, थेऊरच्या मंडल अधिकारी गौरी तेलंग यांनी कामगारांना घेऊन जाण्यासाठी दोन वेगवेगळ्या बसची व्यवस्था केली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

या कामगार निवारा केंद्रात असताना स्थानिक नागरिक, पोलिस व महसूल खात्यातील लोकांकडून मिळालेल्या आदरयुक्त वागणुकीबद्दल या बहुसंख्य परप्रांतीय नागरिकांनी बसमध्ये बसताना आभार व्यक्त केले. त्याचवेळी गावी गेल्यावर कितीही कष्ट पडले, तरी या पुढील काळात आपापल्या गावीच राहणार असल्याचे अनेकांनी सांगितले. तसेच, "नशिबाने महाराष्ट्रात आलोच, तर लोणी काळभोरला नक्कीच भेट देवू,' असेही म्हणत अनेकांनी लोणी काळभोर येथील नागरिकांच्या प्रती स्नेह व्यक्त केला. 

बळजबरीने आणले, पण... 
कर्नाटक राज्यात जाणाऱ्या मंजुळा पवार या कामगार महिलेने "सकाळ'शी बोलताना भावना व्यक्त केल्या की, लोणी काळभोर येथील निवारा केंद्रात बळजबरीने आणले होते. निवारा केंद्रात येताच नवीन प्रदेश, अनोळखी माणसे यांमुळे सुरवातीस भीती वाटली. मात्र, मागील दीड महिन्याच्या कालावधीत स्थानिक लोक, पोलिस व महसूल खात्याच्या लोकांनी सर्वांची आमच्या जेवणाची व निवासाची उत्तम व्यवस्था केली. विशेष बाब म्हणजे, परप्रांतीय असतानाही अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी जिव्हाळ्याची वागणूक दिली. त्यामुळे आम्ही येथील नागरिकांचे ऋणी आहोत. आम्ही या पुढे गावीच राहणार आहोत. परंतु, या परिसरात आलो, तर लोणी काळभोरला नक्कीच भेट देऊ. 


  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com