वणव्यांमुळे भोर तालुक्यातील वन्यजीवसृष्टी धोक्यात
भोर, ता. २७ ः तालुक्यातील डोंगरांवरील वनसंपत्तीची व वणव्यांमुळे मोठी हानी झाली असून हिरवेगार दिसणाऱ्या डोंगररांगा काळ्याकुट्ट दिसू लागल्या आहेत. सोमवारी (२ मार्च) होणाऱ्या होळीच्या सणापूर्वीच निसर्गातील खऱ्याखुऱ्या पर्यावरणाची होळी झाल्याने वनप्रेमी नाराजी व्यक्त करू लागले आहेत. तालुक्याच्या पश्चिमेकडील व दक्षिणेकडील डोंगररांगांवरील वनसमृध्दी नष्ट झाल्यानंतर वणव्यांचे लोन आता पूर्वेकडील डोंगरांवर सुरू झाले आहे.
तालुक्यात आतापर्यंत वडगाव डाळ, भोलावडे, वीसगाव खोरे, आंबवडे, हिर्डोशी व वेळवंड खोऱ्यासह पूर्वेकडील पुणे-सातारा महामार्गालगतच्या किकवी, भोंगवली, कांबरे खेडेबारे, मोहरी या गावांच्या क्षेत्रामध्येही वणवे लागलेले आहेत. एका डोंगरला लागलेला वणवा दोन-तीन दिवस जळत राहतो. यावर्षी दोन महिन्यात वन विभागाचे सुमारे २५ हेक्टर क्षेत्र वणव्यांमुळे जळून गेल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
वणव्यांमुळे जंगलातील प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, किटक व किडामुंगी नष्ट होत असून पर्यावरण साखळी तुटली जात आहे. वन्य प्राण्यांचे खाद्य व पाण्याचे पानथळे बंद झाले आहेत. परंतु वन विभागासह गावांमधील वन संरक्षण समिती, सर्वसामान्य शेतकरी व नागरिक कोणीही याकडे गांभिर्याने लक्ष देत असल्याचे दिसत नाही. तालुक्यातील हिर्डोशी खोरे, वेळवंड खोरे, भूतोंडे खोरे व वीसगाव खोरे येथील जवळजवळ सर्वच डोंगर वनव्यांमुळे काळेकुट्ट दिसू लागले आहेत.
वन विभागाच्या वतीने वनक्षेत्राच्या कडेने जाळरेषा काढण्यात आल्या असल्यामुळे वणव्यांपासून काही वनक्षेत्र नुकसानीपासून वाचले आहे. जाळरेषा म्हणजे दोन क्षेत्रांच्या हद्दीवर सुमारे तीस-चाळीस फूट रुंदीपर्यंतचा परिसर जाळून टाकला जातो. त्यामुळे एका बाजूकडील वणव्यांची आग दुसरीकडे पोचत नाही. मात्र वनक्षेत्रालगत असलेल्या खासगी क्षेत्रात शेतकऱ्यांनी लावलेल्या वणव्यांमुळे वनक्षेत्रही बाधीत झाले आहे.
वन संरक्षण समित्या नावापुरत्याच
वन विभागाच्या वतीने तालुक्यातील अनेक गावात वन संरक्षण समित्या स्थापन केल्या आहेत. परंतु वणवा विझविण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. वन विभागामार्फत तालुक्यातील अनेक गावांमधून नागरिकांना मोफत गॅस सिलींडर दिले गेलेले आहेत. परंतु तरीही वन विभागातील झाडांची कत्तल कमी झालेली नाही. आपल्या मालकीच्या जागेत लागलेली आग विझविण्यासाठी नागरिक धावपळ करतात. परंतु आपल्या जागेशेजारी असलेल्या वन विभागाच्या क्षेत्रातील आग विझविण्यासाठी टाळाटाळ केली जाते.
वन विभाग हतबल
रात्रीच्या वेळी लागलेले वणवे विझविताना वन विभागाचे कर्मचारी हतबल होताना दिसत आहेत. वन विभागाशेजारी असलेल्या खासगी जागेत शेतकऱ्यांकडून वणवे लावले जातात. याशिवाय मद्यपी पर्यटकांकडूनही वणवे लावले जात आहेत. खासगी क्षेत्रातील वणव्यांची आग वन विभागाच्या क्षेत्रावर आल्यानंतर ती थांबवणे कठीण होते. त्यातच वन विभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी आहे. वणवा विझविण्यासाठी नागरिक हवी ती मदत करत नाहीत. तरीदेखील काही ठिकाणचे वणवे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे विझविले गेले.

