अजित पवार, तुम्ही बारामतीचे नाही तर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात...शिवतारे यांचा टोला

 श्रीकृष्ण नेवसे
Sunday, 20 September 2020

पुरंदरमधील कोविड पेशंटच्या सुविधांमध्ये बदल न झाल्यास आंदोलन करण्याचा शिवतारेंनी दिला इशारा

सासवड (पुणे) :  देशाचा मृत्यदर दोन ते अडीच टक्क्यांच्या घरात आहे. मात्र, पुरंदर तालुक्याने ५.२ टक्के मृत्युदर गाठून देशात अव्वल स्थान पटकावले आहे. ही बाब भूषणावह नक्कीच नाही. येथील कोविड रुग्णांबाबतच्या सुविधांमध्ये सुधारणा न झाल्यास; आंदोलन केले जाईल... असा इशारा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवतारे म्हणाले, एप्रिलपासून मी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना जागं करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी हा विषय प्रतिष्ठेचा करून सर्व आलबेल असल्याचा दिखावा करण्यात आला. आज तालुका अशा भयावह स्थितीत पोहोचला आहे. यात आठवडाभरात सुधारणा झाली नाही तर मी माझं किडनीचं आजारपण बाजूला ठेवून आंदोलन करणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवतारे म्हणाले, `संसर्गजन्य आजार हे काय पुढारी वाढवत नसतात. पण प्रशासनावर अंकुश ठेवून वेळच्या वेळेला उपाययोजना करणे हे जबाबदार लोकप्रतिनिधीचं लक्षण आहे. लोकप्रतिनिधींना भविष्यातील धोका लक्षात आणून देऊनही अपेक्षित लक्ष न दिल्याने त्याची किंमत आज संबंध तालुका मोजतोय. बारामती तालुक्यात रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन सिलेंडर्स मुबलक आहेत. पण बाकी तालुक्यांमध्ये लोक तडफडून मरत आहेत. हे चित्र चांगलं नाही. अजित पवारांनी आपण बारामतीचे नाही तर जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहोत याचं भान ठेवायला हवं. मी पत्राद्वारे अजित पवारांना काही तातडीच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. आठवडाभरात परिस्थितीत सुधारणा जाणवली नाही तर मी स्वतःचं आजारपण बाजूला ठेवून इथे आंदोलन करील. तसे मी मुख्यमंत्री, पालकमंत्री, आरोग्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनालाही कळविले आहे.`

शिवतारेंच्या मागण्या... 

  •  सासवडचा ठोक व किरकोळ बाजार दिवे क्रीडा संकुलाच्या जागेत हलवावा.
  • नवीन प्रशासकीय इमारत, जेजुरी ग्रामीण रुग्णालय अशा ठिकाणी मिळून किमान २०० बेडचे कोविड सेंटर उभारावे 
  • तिथे रुग्णवाहिका, ऑक्सिजन सिलेंडर्स, व्हेंटिलेटर्स यांची उपलब्धता करून द्यावी
  • सध्याच्या सासवड, तक्रारवाडी आणि दिवे येथील कोविड सेंटर्समध्ये रुग्णांचे संडास, बाथरूम, बेसिन यांच्या स्वच्छता व्हावी.
  • त्यांना पिण्यासाठी आणि अंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करून द्यावे. 
  • कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णांची नियमित तपासणी करावी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Minister of State Shivtare says he will agitate if there is no change in the facilities of covid patients in Purandar.