कोराईगड भाड्याने देण्‍यास गडकिल्लेप्रेमी, संघटनांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 September 2019

महाराष्‍ट्र शासनाने किल्‍ले खासगी विकसकांना भाडे तत्‍वावर देण्‍याच्‍या धोरणाचा सर्वत्र विरोध होत आहे. वर्ग दोनचे जे पंचवीस किल्‍ले सुरवातीला भाडयाने देण्‍यात येणार आहे, यामध्ये मुळशी तालुक्‍यातील कोराईगड उर्फ कोरीगडचा समावेश आहे.

माले : महाराष्‍ट्र शासनाने किल्‍ले खासगी विकसकांना भाडे तत्‍वावर देण्‍याच्‍या धोरणाचा सर्वत्र विरोध होत आहे. वर्ग दोनचे जे पंचवीस किल्‍ले सुरवातीला भाडयाने देण्‍यात येणार आहे, यामध्ये मुळशी तालुक्‍यातील कोराईगड उर्फ कोरीगडचा समावेश आहे. त्यामुळे बाळोजी नाईक ढमाले कुटुंबीय, गडकिल्लेप्रेमी, विविध संघटनांनी विरोध केला आहे.

मुळशी तालुक्‍यातील पेठशहापुर व आंबवणे या दोन गावांच्‍या मध्‍यभागी कोराईगड आहे. किल्‍ल्‍याला मोठा इतिहास 
आहे. किल्‍ल्‍यांसाठी झालेल्‍या अनेक लढायांचा उल्‍लेख उपलब्‍ध आहे. किल्‍ल्‍याची स्थितीही चांगली आहे. किल्‍ल्‍यांवर 
लक्ष्‍मी तोफा, छोट्या तोफा, कोराईदेवीचे मंदिर, विस्‍तीर्ण पठार, तलाव, आहेत. तटबंदी अजुनही शाबुत आहे. 

पायथ्‍यापासून पायऱ्यांनी अर्ध्‍या तासात किल्‍ल्‍यावर जाता येते. लोणावळ्याजवळ असल्‍याने पर्यटकांची संख्‍याही मोठी 
असते. सह्याद्री प्रतिष्‍ठानच्‍या पुढाकाराने किल्‍ल्‍यावर तोफांना गाडे, प्रवेशद्वार बसविण्‍यात आले आहे. किल्‍ल्‍याच्‍या 
आजुबाजुच्‍या परिसरात सहारा कंपनीची अँबी व्‍हॅली, सहारा सिटी आहे. 

वसईच्‍या लढाईसाठी कोराईगडावरुन शिबंदी पाठवणे, इंग्रजांना कोराईगड लढून घ्‍यावा लागला. कोराईगडावरील 
दारुगोळयाचे कोठार उडाल्‍याने गड इंग्रजांच्‍या ताब्‍यात गेला. असे अनेक ऐतिहासिक संदर्भ उपलब्‍ध असताना तसेच 
किल्‍ल्‍याची स्थितीही चांगली असताना कोराईगड भाडयाने देण्‍याच्‍या विचाराचा ढमाले कुटुंब, गडकिल्‍ले सेवा समिती 
चिंचवड, स्‍वराज्‍य प्रतिष्‍ठाण, गडकिल्‍ले प्रेमी व मुळशीकरांनी कडाडून विरोध केला आहे. 

'तोरणा किल्‍ल्‍यानंतर स्‍वराज्‍यात सामील झालेला दुसरा किल्‍ला म्‍हणजे कोराईगड उर्फ कोरीगड. शहाजीराजे व जिजाऊंशी ढमाले कुटुंबाचे नाते असल्‍याने, ढमालेंनी कोराईगड स्‍वतःहून स्‍वराज्‍यात सामील करुन योगदान दिले. त्‍यानंतर तो अनेकवेळा लढला गेला. किल्‍ल्यावर होणारे आक्रमण टाळण्‍यासाठी सावरगाव येथील लढाईत बाळोजी नाईक ढमाले यांनी प्राणांची आहुती दिली. मुळशी तालुक्‍यातील बलकवडे आदी अनेक कुटुंबाचेही योगदान आहे. त्‍यामुळे कोराईगडाशी आमचे ऐतिहासिक व भावनिक नाते आहे. आमच्‍या अस्मितेशी खेळ करु नये. भाड्याने देण्‍यास आमचा विरोध आहे.

किल्‍ल्‍यांचे संवर्धन शासनाने स्‍वतः करावे, भाडयाने देऊ नये.' ढमाले देशमुख प्रतिष्‍ठान महाराष्‍ट्र राज्‍यचे सत्‍यशील ढमाले, युवराज ढमाले, नंदन ढमाले, मंगेश ढमाले, रवींद्र ढमाले, अजिंक्‍य ढमाले, शशिकांत ढमाले, अश्विन ढमाले, बाळासाहेब ढमाले, ओंकार ढमाले, प्रतीक ढमाले तसेच शेरे, वांद्रे, भोरकस, बेलावडे, मुळशी खुर्द, अंबडवेट, सांगवी, कडूस, टाकवे गावांतील व राज्‍यभर पसरलेल्‍या ढमाले कुटूंबीयांनी शासनाच्‍या धोरणाचा विरोध केला आहे. याबाबत मुख्‍यमंत्री, पर्यटनमंत्री यांना निवेदन देण्‍यात येणार आहे. 

गडकिल्‍ले सेवा समिती चिंचवडचे निलेश गावडे म्‍हणाले, 'गड,किल्‍ल्‍यांचे संवर्धन शासनाने स्‍वतःच्‍या निधीतून करावे. किल्‍ले भाडेतत्‍वाने देणे जनतेच्‍या भावनांशी खेळ आहे, मावळयांचे रक्‍त सांडलेला किल्‍ल्‍यावरील साधा दगडही 
आमच्‍यासाठी अमूल्‍य आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fort Lover of Korigad are Opposing to Rent on Fort