

कोरेगाव भीमा, ता. १७ : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील माजी सरपंच संदीप ढेरंगे यांची तब्बल १३ महिन्यांपूर्वी पहाटेच्या सुमारास केवळ साडेचार मिनिटात चोरीला गेलेली फॉर्च्यूनर मोटार आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे सापडली. विशेष म्हणजे, या मोटारीवर एका बड्या नेत्याच्या वाहनाचा बनावट क्रमांक लावून ती वापरली जात असल्याचे तपासात समोर आले.
संदीप ढेरंगे (वय ४०) यांनी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री एमएच १२ टीएच ९९५५ क्रमांकाची फॉर्च्यूनर मोटार कार्यालयासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे मोटार चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान एका संशयिताला ताब्यातही घेण्यात आले; मात्र मोटारीचा ठावठिकाणा लागत नव्हता. मोटार मिळविण्यासाठी ढेरंगे यांनी स्थानिक पोलिसांसह अन्य राज्यांतील पोलिसांकडेही सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. वर्षभर उलटूनही त्यांनी नवीन मोटार खरेदी केली नाही. आपली चोरीला गेलेली मोटार शोधून काढायचीच, असा त्यांचा निर्धार होता.
दरम्यान, विशाखापट्टणम येथे पोलिसांकडून एका संशयास्पद मोटारीची तपासणी सुरू असताना तिच्यावर बनावट क्रमांक लावल्याचे निदर्शनास आले. एका बड्या नेत्याच्या दुसऱ्या वाहनाचा क्रमांक या मोटारीवर वापरला जात होता. पोलिसांनी मोटारीच्या चेसिस क्रमांकाच्या आधारे मूळ मालकाचा शोध घेत अखेर ढेरंगे यांच्याशी संपर्क साधला. रात्रीच्या सुमारास आलेल्या परराज्यातील फोनमुळे सुरुवातीला ढेरंगे यांना विश्वासच बसला नाही. मात्र, व्हिडिओ कॉलद्वारे मोटार दाखविल्यानंतर आतील फाटलेल्या सीट कव्हरवरून त्यांनी ती आपलीच असल्याची खात्री केली. त्यानंतर शिक्रापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार ढेरंगे, पोलिस हवालदार विश्वंभर वाघमारे आणि अजित इंगवले यांनी विमानाने विशाखापट्टणम गाठले. तेथील पोलिसांच्या मदतीने मोटारीची पाहणी करून पाच दिवसांत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. तब्बल १३ महिन्यांनंतर आपली मोटार समोर पाहिल्यानंतर ढेरंगे यांना झालेला आनंद अवर्णनीय होता. त्यानंतर विशाखापट्टणम येथून चार राज्यांचा प्रवास करीत सलग २६ तासांनी त्यांनी ही मोटार शिक्रापूर पोलिस ठाण्यात आणली.
आंतरराज्य टोळीचा संशय
बनावट वाहन क्रमांक आणि कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या महागड्या मोटारी परराज्यात वापरल्या जात असल्याची शक्यता या घटनेतून पुढे आली आहे. अशा प्रकारांमध्ये आंतरराज्य टोळ्या सक्रिय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिस यंत्रणेने राज्यव्यापी तपासमोहीम राबविल्यास अशा प्रकारे चोरीला गेलेल्या अन्य महागड्या मोटारींचाही शोध लागून वाहन चोऱ्यांना आळा बसू शकतो. तसेच, वाहनमालकांनीही पारंपरिक सुरक्षेसोबतच अतिरिक्त सुरक्षा साधने आणि छुपी जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा बसविण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.