लोणीकंद : खोटे दस्ताऐवज बनवून करोडोंचा गंडा घालणारे चौघे जेरबंद 

लोणीकंद : खोटे दस्ताऐवज बनवून करोडोंचा गंडा घालणारे चौघे जेरबंद 

केसनंद : खोटे दस्तऐवज बनवून करोडोंचा गंडा घालणार्‍या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करून लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी भैरवनाथ बाबुराव साळुंखे (वय 32, रा.धायरकर कॉलनी  कोरेगाव पार्क पुणे), योगेंद्र रघुनाथ खिस्ते (वय 38, रा. अल्फा प्रीमियर विमाननगर पुणे) संदीप सेवकराम बसतानी (वय 38, रा. फ्लॅट नं 502, लक्ष्मी इंक्लेव लोणकर वस्ती, मुंढवा) सुदेश संभाजी राव (वय 34, रा. सुदर्शननगर पिपळे गुरव) यांना ताब्यात घेतले आहे.

अपूर्व सुभाषचंद्र नागपाल (वय 49, रा. क्लेवर हिल्स कोंढवा यांच्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आव्हाळवाडी (ता. हवेली) येथील गट क्रमांक 1235 मध्ये विकत घेतलेले एकूण ४ एकर क्षेत्र फार्महाऊससह नागपाल यांच्या भावाच्या नावावर आहे. मात्र 28 डिसेंबरला  काही जण या जागेवर जेसीबी घेऊन साफसफाई करीत असल्याचे समजल्याने नागपाल यांनी चौकशी केली असता, संबंधितांनी ही जमीन आपण अपूर्व नागपाल व इतरांकडून विकत घेतली असून चेकने ईसार पावती म्हणून एक कोटी रुपये दिल्याचे तसेच उर्वरित 6.5 कोटी रुपये खरेदीखताच्या दिवशी देणार असल्याचे सांगितले.

यावेळी आपणच अपूर्व नागपाल असून याआधी कधीच आपली भेट झाली नसल्याचे नागपाल यांनी सांगितले. दरम्यान आरोपीनी खोटा दस्तऐवज व खोटे जागामालक बनवून फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने नागपाल यांनी लोणीकंद पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

दरम्यान, या गुन्ह्यात आठ ते  दहा लोकांची सुमारे एक कोटी रुपयांची फसवणूक झालेली असल्यामुळे तसेच आरोपींनी अजून अश्या प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता गृहीत धरुन स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक या आरोपींचा शोध व समांतर तपास करीत होते. याच दरम्यान संबंधित आरोपी वाघोलीत येणार असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत चौघांना जेरबंद करुन लोणीकंद पोलीसांकडे साेपविले. पुढील तपास लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस करीत आहेत.

या कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक रामेश्वर धोंडगे, सहाय्यक फौजदार दत्ता जगताप, पोलिस हवालदार अनिल काळे, प्रमोद नवले, पोलिस नाईक गुरू जाधव, अभिजित एकशिंगे, पोलिस शिपाई बाळासाहेब खडके आदींनी सहभाग घेतला.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com