आंबेगावातील चौघी बहिणी अडकल्या

आंबेगावातील चौघी बहिणी अडकल्या

Published on

मंचर, ता. २ :अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यात सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबई येथील विमानसेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दुबई येथे पर्यटनासाठी गेलेल्या आंबेगाव तालुक्यातील चार बहिणी तेथे अडकल्या आहेत. मात्र, त्या सर्वजणी सुरक्षित असून दुबईतील त्यांच्या नातेवाइकांच्या निवासस्थानी वास्तव्यास आहेत, अशी माहिती अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद आरोग्य केंद्रातील सेवानिवृत्त अधिकारी संजय कसाब यांनी दिली.
नंदिनी संजय कसाब (अवसरी खुर्द), सविता गंगाराम बंगाळ (चांडोली बुद्रुक), लता सुहास फलटणे (कळंब) आणि स्मिता मारुती धिमते (लौकी) या चारही बहिणी १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुबई येथे पर्यटनासाठी गेल्या होत्या. या बहिणींचे भाचे गौरव धीमते हे दुबईमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांच्या निवासस्थानी या बहिणीचा मुक्काम आहे. त्यांचे गुरुवारी (ता. ४) दुबई–पुणे परतीचे विमान तिकीट निश्चित होते. मात्र, युद्धाची तीव्रता वाढल्याने दुबईहून भारतात येणाऱ्या विमानसेवा बंद करण्यात आल्या. त्यामुळे भारतातील अनेक पर्यटकांप्रमाणे या चारही बहिणी दुबईत अडकल्या आहेत.
दरम्यान, दुबईतील इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असल्याने काही काळ संपर्क होत नव्हता. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, ‘आम्ही सर्वजणी सुरक्षित आहोत,’ असा संदेश नंदिनी कसाब यांनी पती संजय कसाब यांना पाठवला असून, सोमवारी (ता. २) रात्री त्यांच्याशी मोबाइलद्वारे संवादही झाला आहे. परतीची पुण्याची तिकिटे निश्चित असून त्या सोमवारी (ता. ९) पुणे विमानतळावर पोहोचणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, दुबईत अडकलेल्या भारतीय पर्यटकांना भारतात परत आणण्यासाठी भारतीय दूतावास यांच्याकडून नियोजन सुरू असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
दरम्यान माझी पत्नी नंदिनी कसाब व तिच्या तिन्ही बहिणी सुखरूप आहेत. नातेवाईक व मित्रपरिवाराने काळजी करू नये ."असे संजय कसाब यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com