पुणे : सलमान खानच्या 'किक टू' चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

सलमान खानच्या चित्रपटामध्ये काम करणार का? असे विचारल्यावर कोण नाही म्हणणार. असाच फोन एका महिलेला आला, तिला 'किक टू' या चित्रपटात सलमान खानची सहायक अभिनेत्री म्हणून काम करणार का? असे विचारताच तिने होकार दिला.

पुणे : सलमान खानच्या चित्रपटामध्ये काम करणार का? असे विचारल्यावर कोण नाही म्हणणार. असाच फोन एका महिलेला आला, तिला 'किक टू' या चित्रपटात सलमान खानची सहायक अभिनेत्री म्हणून काम करणार का? असे विचारताच तिने होकार दिला. तिला त्यासाठी पैसे भरायला लावले, पण चित्रपटात काम काही मिळाले नाही. यामध्ये एक लाख 82 हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 44 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हिरल ठक्कर, अमर वुटला यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 15 जून ते 6 ऑगस्ट या कालावधीत घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला एका व्यक्तीचा फोन आला, "किक टू' हा सलमान खानचा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे, त्यासाठी कलाकार निवडण्याचे काम सुरू आहे, तुम्हाला यामध्ये संधी मिळू शकते असे सांगितले.

या महिलेने यावर विश्‍वास ठेऊन काम करण्याची तयारी दाखवली. तसेच महिलेच्या भावाला सहायक दिग्दर्शक म्हणून काम देतो असेही सांगितले. यानंतर या महिलेशी यासदंर्भात अन्य दोन व्यक्‍तींनी संपर्क साधला. वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून एक लाख हजार 82 रुपये बॅंक खात्यात भरायला लावले.

पैसे भरल्यानंतर त्यांना पुढे काहीच निरोप आला नाही. त्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींचे फोन बंद लागत होते. त्यावेळी फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. याविरोधात सायबर शाखेकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास वारजे पोलिस करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud in Pune Fake Promise of Role in Salman Khan Film