एकाच नंबरची प्लेट वापरली दोन वाहनांना अन्...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

- एकाच क्रमांकाची नंबरप्लेट दोन वाहनांना वापरुन शासनाची फसवणूक.

बारामती : एकाच क्रमांकाची नंबरप्लेट दोन वाहनांना वापरुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटारवाहन निरीक्षक हेमंतकुमार सोलनकर यांनी याबाबत फिर्याद दिली. 1 ते 7 फेब्रुवारी 2020 दरम्यान ही घटना समोर आली. सोलनकर यांचे कार्यालयीन सहकारी प्रकाश मुळे यांना एका व्यक्तीने एमएच-42- एक्यू-0711 या बोगस क्रमांकाची गाडी चालवली जात असल्याचे सांगितले. त्यानंतर पियाजिओ कंपनी परिसरात या गाडीचा शोध घेतला गेला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

एका ट्रकची नंबरप्लेट खोडल्याचे तपासणीत दिसल्यानंतर बनावट क्रमांकाद्वारे चालविला जात असलेला हाच ट्रक असल्याची खात्री झाली होती. वाहनचालक जागेवर नसल्याने त्या वेळेस कारवाई झाली नाही. 3 फेब्रुवारी रोजी महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज् प्रा. लि. या कंपनीकडून एक लेखी अर्ज प्राप्त झाला होता. त्या अर्जानुसार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने पियाजिओ कंपनीकडे या वाहनाची कागदपत्रे मागितली. 

याबाबत कंपनीने दिलेल्या माहितीत 30 जानेवारी रोजी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास हे वाहन केरळमधील कुन्नूर येथे आठ रिक्षा घेऊन गेले होते. याच क्रमांकाची गाडी 1 फेब्रुवारी रोजी मटेरियल गेटमधून सव्वादहाच्या सुमारास सूरज इंडस्ट्रीजकडून माल घेऊन आली होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दोन दिवसात केरळमधून मालाची डिलिव्हरी देऊन वाहन परतू शकत नाही हे उघड होते, त्यामुळे शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट नंबरप्लेट, कागदपत्रे वापरुन यात शासनाची फसवणूक झाल्याचे पुढे आले. सहायक पोलिस निरीक्षक महेश विधाते अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud by using the same number plate on two vehicles in Baramati Pune