esakal | लॉकडाउनमध्ये वस्तीतील मुलांसाठी मोफत ‘क्रॅश कोर्स’
sakal

बोलून बातमी शोधा

Step Up Foundation

लॉकडाउनमध्ये वस्तीतील मुलांसाठी मोफत ‘क्रॅश कोर्स’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘लॉकडाउनमुळे (Lockdown) घरात बसून खूप कंटाळा आला होता. शाळा बंद (School CLose) आहे, मित्रांसोबत साधे खेळताही येत नाही. काय करावे हे समजत नव्हते, अशावेळी मी ‘इंग्लिश स्पोकन’चा ‘क्रॅश कोर्स’ (Crash Course) केला. यामुळे इंग्रजीविषयी असणारी माझी भीती तर कमी झालीच; पण आता इंग्रजी बोलण्याचा ही प्रयत्न करीत आहे,’ असे बिबवेवाडीमधील प्रेमनगर वस्तीतील शिवपूत्र कुंभार सांगत होता. (Free Crash Course for Neighborhood Children in Lockdown)

गेली वर्षभरापासून शाळा बंद आहेत. त्यातच लॉकडाउन असल्याने घराबाहेरही पडता येत नाही. दिवसभर घरात काय करणार, असा प्रश्न वस्तीतील मुलांना पडला आहे. त्यावर किशोरवयीन मुलांसाठी काम करणाऱ्या ‘स्टेप अप फाउंडेशन’ने उपाय शोधून काढला आहे. फाउंडेशनच्यावतीने वस्तीतील मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोफत ‘क्रॅश कोर्स’ सुरू केले आहेत.

हेही वाचा: पुण्यातील इंजिनिअरचं हटके 'टूल'; PPE किट ठेवणार 'कूल'

तीन ते पाच दिवसांच्या या कोर्समध्ये नुकतेच तीन कोर्स पूर्ण झाले आहेत. त्यात स्पोकन इंग्लिश, विज्ञान प्रयोगावर आधारित क्राफ्ट ॲक्टिव्हिटी, मार्केटिंग स्कील आदींचा समावेश आहे. या कोर्सचा लाभ सहावी ते दहावी पर्यंतचे १२ ते १८ या वयोगटातील विद्यार्थी घेत आहेत. वस्तीतील मुलांसाठी क्रॅश कोर्स सुरू करण्याआधी बिबवेवाडी परिसरातील वस्त्यांमध्ये १२ ते १८ वयोगटातील सुमारे दोनशे मुलामुलींची रक्त तपासणी करून त्यांना ‘मल्टी व्हिटॅमिन देण्याचा उपक्रमही राबविण्यात आला. मुलींना सॅनिटरी नॅपकिन देण्यात येत असल्याचे फाउंडेशनच्या अध्यक्ष गौरी वेद यांनी सांगितले. आरोग्य प्रकल्पासाठी ‘एमएनजीएल’च्या सीएसआर प्रकल्पातून मदत मिळाली.

मुलामुलींचे सध्याच्या काळात मानसिक आरोग्य टिकून राहावे आणि त्यांच्या कौशल्यांमध्ये वाढ होण्यासाठी फाउंडेशनच्यावतीने कौशल्याधारित उपक्रम राबवले जात आहेत. यात वेगवेगळ्या विषयांवरील ‘क्रॅश कोर्स’चा समावेश आहे. मुलांसोबतच त्यांच्या पालकांचेही आम्ही समुपदेशन करीत असून सध्याच्या परिस्थितीत त्याची नितांत गरज आहे.

- गौरी वेद, अध्यक्ष, स्टेप अप फाउंडेशन.